वेगळी माणसं

By admin | Published: February 13, 2017 11:48 PM2017-02-13T23:48:22+5:302017-02-13T23:48:22+5:30

वेगळी माणसं

Different human beings | वेगळी माणसं

वेगळी माणसं

Next


एखाद्या व्यक्तीचं निधन झालं की त्याच्या कुुटुंबीयांचं सांत्वन करायला जाण्याची आपल्याकडे रीत आहे. वर्षानुवर्षे ही रीत सुरूच आहे. त्यात सहसा कोणी खंड पाडत नाही, की कोणी टाळाटाळही करीत नाही. ज्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, अशा माणसाला आपण परत आणू शकत नाही; परंतु त्याच्या जाण्यानं जो आघात त्या कुटुंबावर झालेला असतो, जे दु:ख झालेलं असतं ते थोडसं कमी करण्याचा प्रयत्न अशा सांत्वनाच्या रितीतून केला जातो. निसर्गनियम मान्य करून तसेच झालेल्या गोष्टी विसरून त्या कुटुंबाने पुढील व्यवहार सुरळीत सुरू करावेत, हा उद्देश त्यामागे असतो. अशा दु:खदप्रसंगी त्या व्यक्तीच्या अनेक चांगल्या गोष्टींवर चर्चा होत राहते. त्याच्या जीवनातील अनेक पैलू उघडले जातात. व्यक्ती किती चांगली होती हेच या चर्चेतून पुढे येते. मनातील साठवून ठेवलेल्या आठवणी दाटून येतात, त्यांना वाट मोकळी करून दिली जाते. त्यातून खरंच दु:खी कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करत राहते आणि त्यांची मनंही हलकी होऊन जातात. त्यामुळे अशा सांत्वनाच्या भेटीला एक भावनिक ओलावा निर्माण होतो.
गेल्याच आठवड्यात माझ्या मित्राच्या मेहुण्याचं अल्पशा आजाराने निधन झालं. ज्यांचे निधन झालं ते माझ्या परिचयाचे नव्हते. त्यांना मी कधी पाहिलंही नव्हतं; परंतु मित्राचे मेहुणे एवढंच काय ते आमचं नातं! बरं हे मित्रही काही लांबचे नव्हते. अगदी शेजारीच. निधन झालेली व्यक्ती जत तालुक्यातील उमराणी गावची. घरी आई आणि ते असे दोघेच राहायचे. वय वर्ष ५२, पण अविवाहित होते. एके दिवशी थोडा ताप आला. माणसाच्या सवयीप्रमाणे दोन-चार दिवस ताप अंगावर काढला. किरकोळ औषधं घेतली आणि तोच ताप जीवघेणा ठरला. कोल्हापुरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल केलं होतं पण काही उपयोग झाला नाही. एकेदिवशी ते गेले. आता गावी अंत्यसंस्कार करायचं म्हटलं तर पाहुणे सगळे कोल्हापूर आणि परिसरात. त्यामुळे अंत्यसंस्कार कोल्हापुरातच करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे माझ्या मित्रांच्या घरी म्हणजे मृताच्या बहिणीच्या घरी ‘बॉडी’ आणण्याचा निर्णय झाला. नेमकं मी त्यावेळी कामावर असल्याने असा निरोप मिळाला नाही. रात्री उशिरा घरी पोहोचल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं. त्यांच्या घरी जाऊन भेटून येणं आपलं कर्तव्य आहे, असं समजून मी सांत्वनासाठी गेलो.
गावाकडं मोठसं घर, शेतजमीन २८ एकर, शेतात-घरात नोकरगडी, म्हटलं तर छानसं जीवन चाललं होतं. आई शिक्षिका होऊन निवृत्त झालेल्या. एक बहीण नोकरी करणारी, तर दुसरी गृहिणी ! अशा सधन व सुशिक्षित घरात जन्मलेल्या या व्यक्तीला कोणीही मुलगी दिली असती; पण लग्नाचा योग नव्हता म्हणायचा की यांचीच इच्छा नव्हती, हे काही कळलं नाही. नियतीनं हा योग जुळवून आणलाच नाही, हे मात्र खरे. हा माणूस फारच प्रेमळ. केवळ आपल्या कुटुंबातच नाही, तर त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व व्यक्तींशी ते प्रेमळ वागत असत. घरगड्यांचाही ते आपुलकीनं विचारपूस करायचे. त्यांच्या अडचणी दूर करायचे. गरीब असलेल्या एका ख्रिश्चन महिलेने मुलाकरीता कपड्यांची मागणी केली तेव्हा त्यांनी आपले स्वत:चे नवीन कपडे देऊन त्यांच्या आनंदात सहभाग घेतला. शेतात काम करणारा मजूर म्हणजे गरीबच. त्यांच्याशी शेतकामाबाबत चर्चा करण्यासाठी त्याला मोबाईल तर दिलाच, शिवाय प्रत्येक महिन्याला रिचार्जही आठवणीनं मारायचे. कुटुंबात किंवा नात्यातील मंडळींच्या घरी काही कार्यक्रम असला की हे नेहमी पुढे असायचे. एवढेच नाही तर त्यांना घेऊन जाण्याची व आणण्याची जबाबदारीसुद्धा घ्यायचे. कोणाकडे पैसे मागितले नाहीत, उलट दुसऱ्यासाठी स्वत:च खर्च करायचे. त्यांच्या अनेक चांगल्या गोष्टींची मला उकल झाली म्हणूनच या न पाहिलेल्या व्यक्तीबद्दल मलाही अप्रुप वाटले.
काही मूठभर माणसं अशी असतात की आपल्यासाठी सर्व सुखं अवतीभोवती असताना केवळ दुसऱ्याच्या सुख-दु:खातच आपलं सुख मानून जगतात. श्रीमंतीचं, सुखाचं वैभव असतानाही साधी राहणी पसंत करतात. सातत्याने दुसऱ्याचा विचार, मदत करतात. राग-लोभ-मोह-माया-मत्सर यापासून कोसो दूर राहून नि:स्वार्थी, परोपकारी, विरक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच ती इतरांपेक्षा वेगळी असतात.
- भारत चव्हाण

Web Title: Different human beings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.