यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्यांची आवश्यकता : डॉ. जत्राटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 10:37 AM2020-01-31T10:37:31+5:302020-01-31T10:44:43+5:30
डॉ. आलोककुमार जत्राटकर म्हणाले, उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नावीन्यपूर्ण ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक ज्ञानात केला तर तो खऱ्या अर्थाने वर्तमानकाळातील यशाचा मंत्र आहे. कोल्हापूर आकाशवाणीच्या निवेदिका नीना मेस्त्री-नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
कोल्हापूर : आयुष्याच्या विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी विविध कौशल्यांची आवश्यकता असते. विवेकानंद महोत्सव हा अशाच वेगवेगळ्या कौशल्यांचा शोध आणि वेध घेणारा आहे. तो चैतन्याचा शोध घेणारा एक मंच आहे व सर्जनशीलतेला वाव देणारे व्यासपीठसुद्धा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोककुमार जत्राटकर यांनी गुरुवारी केले.
विवेकानंद कॉलेज (स्वायत्त)च्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये आयोजित ‘विवेकानंद महोत्सव २०२० - शोध चैतन्याचा’ या राष्ट्रीय तीनदिवसीय महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते.
डॉ. आलोककुमार जत्राटकर म्हणाले, उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नावीन्यपूर्ण ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक ज्ञानात केला तर तो खऱ्या अर्थाने वर्तमानकाळातील यशाचा मंत्र आहे.
कोल्हापूर आकाशवाणीच्या निवेदिका नीना मेस्त्री-नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी ‘विवेकानंद महोत्सव’ या नवीन संकल्पनेचे स्वागत करीत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सहप्रायोजक एकनाथ सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. महोत्सवाच्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कविता तिवडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात देशभरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग होता. महोत्सवामध्ये वादविवाद स्पर्धा, अभिवाचन स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा पार पडल्या.
आज महोत्सव
महोत्सवात शॉर्टफिल्म मेकिंग स्पर्धा, विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्टुडंट्स स्टार्टअप स्पर्धा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. १ फेब्रुवारी रोजी फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.