साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण--सरकारकडून निर्यात अनुदानाच्या अटी शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:46 AM2018-06-30T00:46:09+5:302018-06-30T00:46:58+5:30
चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने निर्धारित केलेले २० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे लक्षात आल्याने केंद्र सरकारने साखर निर्यातीच्या अटी शिथिल केल्या आहेत. तरीही चालू साखर हंगामाअखेर सुमारे १० लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या सर्व सूचना आणि नियमांचे पालन करणाऱ्या कारखान्यांनाच निर्यात अनुदान देण्यात येईल, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आधीच्या आदेशात म्हटले होते. हे अनुदान प्रती टन ५५ रुपये ऊस उत्पादकाच्या खात्यावर थेट जमा केले जाणार आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये अनेक साखर कारखान्यांनी विशेषत: खासगी साखर कारखान्यांनी साठा मर्यादेचे उल्लंघन करून साखर विकली होती. ते कारखाने साखर निर्यात अनुदानाला अपात्र ठरत होते. निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नाही, असे दिसताच केंद्राने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यात इतर सर्व अटी आहेत, मात्र फेब्रुवारी, मार्चमधील साठा मर्यादेची अट समाविष्ट नाही, त्यामुळे अपात्र ठरणारे अनेक खासगी कारखानेही निर्यात अनुदानास पात्र ठरणार आहेत.
कोटा विकण्यास परवानगी
सरकारने २० लाख टन साखरेची निर्यात करण्यासाठी कारखान्यांना निर्यात कोटा ठरवून दिला आहे. मात्र, आतापर्यंत कसेबसे कारखान्यांना २ लाख ४४ हजार टन साखर निर्यात करता आली आहे. साखर निर्यात करणे ज्या कारखान्यांना शक्य नाही त्यांनी निर्यात अनुदान मिळविण्यासाठी आपला कोटा अन्य कारखान्यांना विकता येतो. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील साखर कारखाने निर्यात कोटा उत्तर प्रदेशातील कारखान्यांना ७५0 रुपये प्रति क्विंटल या दराने विकत आहेत. अटी शिथिल केल्याने अनुदानास पात्र ठरणारे कारखानेही निर्यात करण्यासाठी किंवा कोटा विकण्यासाठी पुढे येतील. यामुळे चालू साखर हंगामाअखेर म्हणजेच सप्टेंबरअखेर सुमारे दहा लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. ती निर्धारित लक्ष्यापेक्षा निम्मीच लक्ष्य गाठण्याची शक्यता आहे.
उशिरा सुचलेले शहाणपण
साखर निर्यात अनुदानाच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. हा निर्णय दोन-तीन महिन्यांपूर्वी झाला असता तर कारखान्यांना ते सोयीचे ठरले असते. आता पावसाळा सुरू झाला असल्याने निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चीन, श्रीलंका, सुदानला निर्यात
सध्या चीन, श्रीलंका, सुदान, सोमालिया आदी देशांना साखर निर्यात होत आहे. आतापर्यंत बंदर जवळ असल्याने महाराष्टÑ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कारखान्यांनी साखर निर्यात केली आहे.
साखर निर्यातीच्या अटी शिथिल करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे आणखी साखर कारखाने निर्यातीसाठी पुढे येतील. सप्टेंबरअखेर सुमारे १० लाख टन साखरेची निर्यात होऊ शकेल.
- प्रफुल्ल विठलानी
अध्यक्ष, आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन.