पुरेसे पाणी, वीज पुरवठा नसल्याने पूरबाधित दुकानांच्या स्वच्छतेत अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:16+5:302021-07-29T04:24:16+5:30
कोल्हापूर : शहरातील पूरबाधित दुकानांमधील चिखल, पाणी काढण्याचे काम बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होते. मात्र, पुरेसे पाणी आणि ...
कोल्हापूर : शहरातील पूरबाधित दुकानांमधील चिखल, पाणी काढण्याचे काम बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होते. मात्र, पुरेसे पाणी आणि वीज पुरवठा नसल्याने या दुकानांची स्वच्छता करणे व्यापारी, व्यावसायिकांना अडचणीचे ठरत आहे.
महापुरामुळे लक्ष्मीपुरी, शाहुपुरी, स्टेशन रोड, व्हिनस कॉर्नर, दुधाळी मैदान परिसरातील विविध व्यापारी, व्यावसायिक, विक्रेत्यांची दुकाने पाण्यात बुडाली. पावसाने सोमवारपासून विश्रांती दिल्याने आणि पुराचे पाणी ओसरू लागल्याने या व्यापारी, व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांमध्ये साचलेला चिखल, पाणी काढण्यासह स्वच्छतेचे काम सुरू केले. त्यामध्ये पुराच्या पाण्यात बुडून खराब झालेले दुकानांतील साहित्य बाहेर काढणे, फर्निचर वाळवणे, आदींचा समावेश आहे. मात्र, चिखल आणि पुराचे दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर काढल्यानंतर स्वच्छतेसाठी पुरेशा स्वरूपात पाणी उपलब्ध होत नाही. वीज पुरवठा सुरू नसल्याने विद्युत मोटारही लावता येत नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही बहुतांश दुकानांच्या स्वच्छतेची कामे सुरू राहिल्याने तेथील व्यवहार बंदच राहिले. पूरबाधित क्षेत्रातील मोजकीच दुकाने सुरू झाली. महापालिकेने स्वच्छतेकरिता पाणी तर महावितरणने वीज पुरवठा लवकर सुरळीत करावा, अशी मागणी व्यापारी, व्यावसायिकांनी केली आहे.
प्रतिक्रिया
महापुरामुळे दसरा चौक - व्हिनस कॉर्नर मार्गावरील आमच्या शोरूममध्ये मोठ्या प्रमाणात चिखल, पाणी साचले. ते बाहेर काढून स्वच्छतेचे काम अजून सुरू आहे. पुरेसे पाणी, वीज पुरवठा नसल्याने स्वच्छतेचे काम करण्यात अडचण येत आहे. महापालिका, महावितरणने आमची अडचण दूर करावी.
- कश्यप शहा, नॉव्हेल्स ॲप्लायन्सेस.
व्हिनस कॉर्नर परिसरातील आमच्या दुकानामध्ये महापुराचे पाणी शिरले. दुकानाच्या स्वच्छतेचे काम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आवश्यक त्या प्रमाणात पाणी मिळाल्यास आणि वीज पुरवठा सुरू झाल्यास आणखी वेगाने स्वच्छतेचे काम आम्हाला करता येईल.
- संताजी जाधव, शिव मोबाईल्स.
चौकट
रस्त्यांची स्वच्छता लवकर करावी
पूरबाधित क्षेत्रातील बहुतांश रस्त्यांवर चिखल साचला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये महानगरपालिकेने काही प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील चिखल काढून ते स्वच्छ केले आहेत. मात्र, अद्याप लक्ष्मीपुरी, शाहुपुरी, व्हिनस कॉर्नर परिसरातील काही रस्त्यांवर चिखल तसाच आहे. या रस्त्यांची लवकरात लवकर स्वच्छता करण्याची मागणी या परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांकडून होत आहे.