बिनविरोध झालेल्या ठिकाणी दुसऱ्यांदा होण्यात अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:16+5:302020-12-29T04:23:16+5:30

राधानगरी : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा होते. यातून गावातील माणसा-माणसांत दरी निर्माण होते. पैशाचा ...

Difficulty in getting a second time in an unopposed place | बिनविरोध झालेल्या ठिकाणी दुसऱ्यांदा होण्यात अडचण

बिनविरोध झालेल्या ठिकाणी दुसऱ्यांदा होण्यात अडचण

Next

राधानगरी : ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा होते. यातून गावातील माणसा-माणसांत दरी निर्माण होते. पैशाचा चुराडा होतो. यातून पुढील काळात गावातील वातावरण बिघडलेले असते. विकासकामे करताना अडचणी निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी अनेक गावांत बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न होतो. काही ठिकाणी यात यशही येते. मात्र, अनेक गावांतील ग्रामस्थाना नंतर वेगळा अनुभव येतो. एकदा बिनविरोध सत्ता मिळाली की लोकांना दुर्लक्षित केले जाते. ज्या उद्देशाने बिनविरोध निवडीचा खटाटोप केला जातो, तो उद्देशच बाजूला पडतो. त्यामुळे एकदा बिनविरोध निवड झालेल्या गावात सहसा दुसर्‍यांदा हे प्रयत्न यशस्वी होत नाहीत, असे सर्वसाधारण चित्र आहे.

स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीवर सत्ता असल्यास असणारी प्रतिष्ठा, विकासकामे करण्याची व सत्तेची फळे चाखण्याची मिळणारी संधी अशा कारणामुळे ही सत्ता मिळविण्यासाठी मोठी धडपड होते. मात्र, सजग झालेली सध्याची पिढी, अनेकांची वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा व त्यामुळे वाढलेली स्पर्धा यामुळे ही बाब पूर्वीएवढी सहजसोपी राहिलेली नाही. ईर्ष्येने होणार्‍या निवडणुका पुढील काळात विकासात अडचणीच्या होतात. अनेक कामांना राजकीय दृष्टिकोनातून विरोध वा समर्थन दिले जाते. तरीही निवडणुकीचा दबाव असल्याने व विरोधकांचे लक्ष राहत असल्याने जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे अपवाद वगळता अनेक ठिकाणी अनेक समस्या सोडविण्याचा व चांगली विकासकामे करण्याचा प्रयत्न होतो.

याउलट चित्र बिनविरोध निवडणूक झालेल्या गावात असते. निवडणुकीनंतर लोकांचे फारसे लक्ष नसते. सर्वसमावेशक सदस्य असल्याने कोणीच कोणाविरोधात बोलत नाही. त्याचा परिणाम बेलगाम कारभार होण्यात होतो, असा सार्वत्रिक अनुभव येतो. त्यामुळे एकदा बिनविरोध निवडणूक झालेल्या गावात पुन्हा याबाबत फारसे स्वारस्य नसल्याचे चित्र दिसते. एकतर्फी सत्ता असणार्‍या ठिकाणीही अशी स्थिती असते.

२०१५ मध्ये राधानगरी तालुक्यात २० गावांत निवडणुका झाल्या. त्यापैकी हेळेवाडी, बुरंबाळी, चाफोडी तर्फ असंडोली, सावर्दे-वडाचीवाडी, राजापूर, कंथेवाडी, आणाजे या सात ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. बरगेवाडी येथेही बिनविरोध निवड झाली; मात्र सात पैकी चार उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक स्थगित झाली होती. यापैकी आता बुरंबाळी, चाफोडी, सावर्दे यासह अन्य काही गावांत बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Difficulty in getting a second time in an unopposed place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.