सीईटीचा अर्ज भरण्यात ‘सर्व्हर डाऊन’ची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:16 AM2021-07-22T04:16:00+5:302021-07-22T04:16:00+5:30
कोल्हापूर : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) ऑनलाईन अर्ज भरण्यात बुधवारी सर्व्हर डाऊनची अडचण निर्माण झाली. ...
कोल्हापूर : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) ऑनलाईन अर्ज भरण्यात बुधवारी सर्व्हर डाऊनची अडचण निर्माण झाली. दिवसभर प्रतीक्षा करून अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दि. २१ ऑगस्टला सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी अर्ज करण्यास विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद लाभला. या प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी काही विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनवरून, तर अधिकत्तर विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील नेटकॅफे आणि इंटरनेटची सुविधा असणाऱ्या ठिकाणी जाऊन शिक्षण मंडळाने दिलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळपासून विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊनच्या अडचणीचा सामना करावा लागला. संकेतस्थळावर विद्यार्थ्याने त्याचा बैठक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची पुढील प्रक्रिया करता येत होती. मात्र, बैठक आणि मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर काही क्षणात ‘द वेबसाईट हॅज बीन टेम्पररी शट डाऊन फॉर टेक्निकल रिझन’ या संदेश कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसत होता. सर्व्हर डाऊनची तांत्रिक समस्या दूर होऊन अर्ज भरता येईल याची दीड ते दोन तास विद्यार्थ्यांनी प्रतिक्षा केली. पण, त्यांना अर्ज भरता आले नाहीत. या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी हैराण झाले. दहावीची ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर देखील सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणीमुळे रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची प्रतीक्षा करावी लागली होती.
प्रतिक्रिया
वडिलांच्या स्मार्टफोनवरून सकाळी सीईटीचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली; पण सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरता आला नाही. ही तांत्रिक अडचण सायंकाळपर्यंत कायम होती. सर्व्हर डाऊनची समस्या शिक्षण मंडळाने लवकर दूर करावी.
-दर्शन पाटील, विद्यार्थी, मोरेवाडी
सीईटीचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांचा बैठक आणि मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर पुढे ऑनलाईन प्रक्रिया जात नव्हती. सर्व्हर डाऊनची अडचण दिवसभर निर्माण झाली. अनेक विद्यार्थी प्रतीक्षा करून घरी निघून गेले.
-सतीश पाटील, नेटकॅफे चालक, मिरजकर तिकटी
फोटो (२१०७२०२१-कोल-सीईटी फोटो)