तंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्राची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:02+5:302021-07-23T04:16:02+5:30
अकरावी प्रवेश परीक्षा सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांसमोर पेच अनिल पाटील, मुरगूड : राज्यातील सुमारे ६५ हजार विद्यार्थी यावर्षी दहावीमध्ये ...
अकरावी प्रवेश परीक्षा
सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांसमोर पेच
अनिल पाटील,
मुरगूड : राज्यातील सुमारे ६५ हजार विद्यार्थी यावर्षी दहावीमध्ये तंत्र विषय घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यातील सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनी नववी व दहावीमध्ये समाजशास्त्र या विषयाऐवजी तंत्र (टेक्निकल) विषय निवडला आहे. अकरावी प्रवेश परीक्षेमध्ये मात्र शिक्षण विभागाने समाजशास्त्र विषय सक्तीचा केला आहे. त्यामुळे या प्रवेश परीक्षेत दोन वर्षे समाजशास्त्रपासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. यावर शिक्षण विभागाने तत्काळ तोडगा काढला नाही तर या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत २५ गुणांचा फटका बसणार आहे.
विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे यासाठी राज्यातील शेकडो माध्यमिक शाळेत तंत्र विषय आणि त्यासाठी स्वतंत्र शिक्षक, वर्कशॉपची निर्मिती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दहावीच्या बोर्ड परीक्षेत या विषयाला विशेष महत्त्व नव्हते. पण दोन वर्षांपासून या विषयाचे गुण विद्यार्थ्यांच्या अंतिम गुणांच्या सरासरीत धरण्याचा निर्णय घेतल्याने या विभागाकडे ओढा वाढला आहे. आयटीआय आणि अभियांत्रिकीसाठी तंत्र विषय महत्त्वाचा ठरत आहे.
शिक्षण विभागाने जर विद्यार्थी तंत्र विषय घेणार असतील तर त्यांना त्या विषयाऐवजी हिंदी किंवा समाजशास्त्र या दोनपैकी एक विषय वगळण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार यावर्षी सुमारे ६५ हजार विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र विषय वगळला आहे. त्यामुळे नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात समाजशास्त्र या विषयाचा त्यांना गंधही नाही.
दरम्यान, यावर्षी अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने प्रवेश परीक्षेचे नियोजन केले आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी सर्व विषय आणि अभ्यासक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सर्वांनाच इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. यातील सर्व प्रश्न हे दहावीच्या अभ्यासक्रमाशी निगडित असणार आहेत.
त्यामुळे समाजशास्त्र विषयाऐवजी तंत्र विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांची चांगलीच गोची झाली आहे. याबाबत शासनाने तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चौकट
विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये
या समस्येबाबत आम्ही तंत्र विभागाच्यावतीने शिक्षक आमदार तसेच शिक्षण विभाग यांच्याशी संपर्क साधला आहे. याचा अगोदर विचार व्हायला पाहिजे होता; पण तरीही तंत्र विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. शिक्षण विभाग सकारात्मक तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.
सुभाष कलागते, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अशासकीय तांत्रिक महासंघ
आमच्यावर अन्याय होऊ नये
व्यावसायिक शिक्षणामध्ये करिअर करायचे म्हणून आम्ही नववीपासून तंत्र विषय निवडला. त्यामुळे हिंदी हा विषय ठेवून समाजशास्त्र अभ्यासक्रमातून वगळला. आता सीईटीच्या परीक्षेत समाजशास्त्र या विषयावर पंचवीस गुणांवर पंचवीस प्रश्न विचारणार आहेत. आम्हाला यातील काहीच माहिती नाही, मग आमचे गुण कमी झालेस आम्हाला प्रवेश मिळण्यास अडचणी येतील. त्यामुळे भीती वाटत आहे.
साक्षी विजय सापळे, विद्यार्थिनी, मुरगूड विद्यालय, मुरगूड
तंत्र विद्यार्थ्यांनी गडबड करू नये
या समस्येबाबत तंत्र विभाग सातत्याने शिक्षण विभागाच्या संपर्कात आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. cet प्रवेश फॉर्म भरण्याची मुदत अजून आहे. लगेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यासाठी गडबड करू नये.
श्री. पी. बी. लोकरे, अधिव्याख्याता, मुरगूड विद्यालय तंत्र विभाग