दिगंबर जैन समाजाचा सरकारला ताकद दाखवण्याचा इशारा, कोल्हापुरात भव्य मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:59 PM2024-10-08T16:59:20+5:302024-10-08T16:59:57+5:30
मोर्चाद्वारे पालकमंत्र्यांना निवेदन : श्वेतांबर समाजाची दादागिरी सुरू असल्याचा आरोप
कोल्हापूर : अकोला जिल्ह्यातील शिरपूर येथे आलेल्या गुजराती जैन श्वेतांबरांची अनेक ठिकाणी दादागिरी सुरू आहे. यातूनच शिरपूर येथील अंतरिक्ष दिगंबर जैन मंदिरात अतिक्रमण केले जात आहे. मारहाणीसारखे प्रकार होत आहेत. याबाबत राज्यातील पोलिस खाते भाजपच्या एका श्वेतांबर मंत्र्याच्या दबावाखाली काम करत आहेत. हा प्रकार थांबला नाही तर विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवून देऊ, असा इशारा सोमवारी देण्यात आला. कोल्हापूर जिल्हा दिगंबर जैन समाजातर्फे याच कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सकाळी जिल्हाभरातून दसरा चौकात मोठ्या संख्येने मोर्चेकरी जमले. यानंतर ‘हम सबका एक नारा है, अंतरिक्ष पार्श्वनाथ हमारा है’ यासह अन्य घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यावेळी अंतरिक्ष जैन मंदिरात ज्यांना मारहाण झाली त्या अभयकुमार बरगाळे यांनी स्वागत करून अंतरिक्ष मंदिरात सुरू असलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली.
ते म्हणाले, श्वेतांबरांचा या मंदिरांशी कोणताही संबंध नव्हता. परंतु व्यापाराच्या नावाखाली काहीजण इथे आले आणि त्यांनी या ठिकाणी दादागिरी सुरू केली. आता येथील मूर्ती, मंदिरे आमचीच आहेत म्हणून ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. माझ्यावर पाच वेळा हल्ले झाले. याबाबत पोलिसांत तक्रार द्यायला गेलो रात्री दीडपर्यंत मला बसवून ठेवण्यात आले. श्वेतांबरांना बोलावून आधी त्यांची तक्रार घेतली गेली. या अन्यायाविरोधात आता राज्यभर आंदोलने करणार आहोत.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, सावकर मादनाईक, स्वरूपा यड्रावकर, डॉ. पद्माराणी पाटील, विजय पाटील, अमर मार्ले, अशोक बहिरशेट, डॉ. शीतल पाटील, डॉ. शांतीनाथ चौगले, सुरेश भोजकर, भरत वणकुद्रे, संजय कोटावळे, विशाल मिठारी, संदीप ढणाल, सचिन मिठारी, सतीश पत्रावळे, भूषण कावळे, राजू शेटे, अकलंक कमटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.