मुस्लिम मराठी साहित्याचे होणार डिजिटायझेशन

By admin | Published: January 3, 2017 01:09 AM2017-01-03T01:09:19+5:302017-01-03T01:09:19+5:30

दुर्मीळ ग्रंथांचे जतन : जगभरातील संशोधकांना उपयुक्त; कथा, कादंबरी, ललित वाङ्मय लेखनाचा समावेश

Digital Marathi Literature will be digitized | मुस्लिम मराठी साहित्याचे होणार डिजिटायझेशन

मुस्लिम मराठी साहित्याचे होणार डिजिटायझेशन

Next

संतोष तोडकर-- कोल्हापूर --मुस्लिम बोर्डिंग हाऊस येथे मे महिन्यात सुरू करण्यात आलेल्या मुस्लिम मराठी साहित्य संशोधन केंद्रातील ग्रंथांचे, पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून, त्यामुळे त्यांचे जतन होण्यासह जगभरातील संशोधकांना ते आॅनलाईन उपलब्ध होणार आहे.
मुस्लिम मराठी साहित्यात नवलेखक घडावेत, त्यांना प्रेरणा मिळावी व दर्जेदार साहित्यनिर्मिती व्हावी तसेच समग्र साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे या हेतूने मेमध्ये या केंद्राची स्थापना करण्यात आली. मुस्लिम मराठी साहित्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रात सद्य:स्थितीला ७०० हून अधिक पुस्तकांचा संग्रह करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘विश्वस्त समाजाचे’, ‘माझ्या गावचं गाणं’, डॉ. अजिज नदाफ यांचे ‘शाहीर अमर शेख’ यासह वेगवेगळ्या परिप्रेक्षांत व कालावधीत समाजाचे केलेले चित्रण, सार्वभौम मुस्लिम अस्मिता, जीवनशैली, सर्वसमावेशक इस्लाम संस्कृती, इतिहास, समस्या, भविष्यातील आव्हाने यांवर आधारित कथा, कादंबरी, ललित वाङ्मय लेखनाचा समावेश आहे.
पंधराव्या शतकापासून मुस्लिम मराठी संतसाहित्याची परंपरा आढळते. या कालखंडात सुमारे ४९ मुस्लिम-मराठी संतकवी होऊन गेले. शहा मुंतोजी, ब्रह्मणी, बाबा शेख महंमद, हुसेन अंबरखान, अलमखान अशा मोजक्याच संतकवींच्या रचना आज उपलब्ध आहेत. साहित्य आणि समाज या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर प्रभाव पडत असतो. समकालीन वर्तमान वास्तवाला घेऊन पुढे जात आहे. डॉ. यू. म. पठाण, हमीद दलवाई, मुबारक शेख, डॉ. रफिक सूरज, समर खडस यांच्यासह अनेक साहित्यिकांनी त्या-त्या काळातील वास्तवाची
मांडणी आपल्या साहित्यकृतींमधून केली आहे. आज महाराष्ट्रात
सुमारे ५०० ते ६०० मुस्लिम लेखक आहेत.
या सर्व लेखकांची किमान दीड ते दोन हजारांहून अधिक ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. अशा वेगवेगळ्या कालावधींत मुस्लिम मराठी लेखकांचे साहित्य अभ्यासकांना उपलब्ध व्हावे यासाठी त्याचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी खासदार संजय काकडे यांच्यासह आमदार राजेश क्षीरसागर यांनी मदतीचा हात दिला आहे.

सध्या केंद्राकडे असलेल्या ग्रंथांचे डिजिटायझेशन हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी लेखक, प्रकाशक यांच्या आवश्यक त्या परवानग्या घेण्यासह विखुरलेल्या मुस्लिम मराठी साहित्यिकांशी संपर्क साधण्यात येत असून, लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.
- गणी आजरेकर,
चेअरमन, मुस्लिम बोर्डिंग हाऊस

Web Title: Digital Marathi Literature will be digitized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.