बोरवडेच्या उजव्या कालव्यावरील जीर्ण पूल कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2024 03:07 PM2024-04-14T15:07:50+5:302024-04-14T15:08:56+5:30
पर्यायी सोय नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा
दत्ता लोकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, सरवडे : बोरवडे ( ता. कागल ) येथील हद्दीत गावच्या डोंगर भागात शेतीच्या कामांनी व वरील पिकवलेला ऊस ने आण करण्यासाठी हा पूल अत्यंत उपयोगी होता.तो पुल आज रविवारी सकाळी कोसळला. दोन वर्षांपासून पुलाच्या पिलरचे दगड कोसळू लागल्याने पुल धोकादायक बनला होता.यासंबंधी वारंवार पाठपुरावा करुनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज पुलाचा पिलर कोसळत पूल वाहत्या पाण्यात ढासळला. यामुळे डोंगर भागाकडे जाणारा मार्गच बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. या ठिकाणी लवकरात लवकर नवीन पुल उभारावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी सन १९८७ ला ३५ वर्षांपूर्वी पुल उभारला होता. या भागात परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती असल्याने शेतकऱ्यांना या पुलावरुनच वाहतुक करावी लागते. कॅनॉलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाच्या शेतीचे क्षेत्र आहे या विभागात सुमारे ४० हजार टन ऊस कारखान्यांना जातो.या पुलावरुन ऊसाची वाहतुक सुरु असते.
दोन वर्षांपासून या पुलाच्या पिलरचे दगड निखळून पडल्याने पुलाला धोका निर्माण झाला होता. याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी येथे नवीन पुल उभारण्याची मागणी केली होती. परंतू या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने हा पुल आज पडला. यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दूरवर १० कि.मी अंतरावरून मुदाळ तिट्टा येथील पुलावरुन ये-जा करावी लागणार असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या ठिकाणी नवीन पुल तात्काळ उभारावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला
या कालव्यावरुन सकाळी ट्रँक्टरमध्ये महिला बसून भेतीच्या कामासाठी निघाल्या होत्या. तो पुढे गेला आणि मागून मोकळा ट्रँक्टर जात असताना पूल कोसळला गावकऱ्यांनी ट्रँक्टर बाहेर काढला त्यामुळे नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.