Kolhapur: चित्रपट महामंडळातील वादात तीन कोटींच्या वास्तूचे दशावतार, भूतबंगल्यासारखी झाली अवस्था

By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 28, 2023 12:31 PM2023-04-28T12:31:11+5:302023-04-28T12:33:12+5:30

कारभाऱ्यांच्या या वादात आता वास्तूची अवस्था ‘अरे, ही नवी इमारत होती?’ असा प्रश्न पडण्यासारखी झाली

Dilapidated condition of the three crores Vastu in the dispute in the film corporation in kolhapur | Kolhapur: चित्रपट महामंडळातील वादात तीन कोटींच्या वास्तूचे दशावतार, भूतबंगल्यासारखी झाली अवस्था

छाया : आदित्य वेल्हाळ

googlenewsNext

इंदूमती गणेश 

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील कारभाऱ्यांच्या वादात साडेतीन वर्षांपूर्वी कार्यालयासाठी खरेदी केलेल्या नव्या वास्तूच्या दुर्दैवाचे दशावतार झाले आहेत. अर्धवट झालेले सिलिंग, फर्निचर, विद्युत व्यवस्था, फरशीवर वीतभर साचलेली धूळ, प्लायवूडसह बांधकामाचा पडलेला कचरा, लटकलेल्या वायरी अशी एखाद्या भूतबंगल्यापेक्षाही वाईट अवस्था या नव्या कोऱ्या वास्तूची झाली आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्यालय कोल्हापूर असल्याने येथे महामंडळाचे देखणे कार्यालय व्हावे या उद्देशाने २ ऑगस्ट २०१९ रोजी रेल्वे स्टेशनसमोर उभारण्यात आलेल्या नव्या टोलेजंग इमारतीत अडीच हजार स्क्वेअर फुटांची वास्तू २ कोटी ४५ लाखांना खरेदी करण्यात आली. हे मुंबई, पुण्यापेक्षा सर्वांत मोठे कार्यालय आहे. ते खरेदी करण्यासाठी कोल्हापूरच्या संचालकांनी, चित्रपट व्यावसायिकांनी जंगजंग पछाडले होते.

या वास्तूची सद्य:स्थिती काय हे पाहण्यासाठी ‘लोकमत’चे प्रतिनिधी गेले असता फरशीवर आणि अर्धवट काम झालेल्या फर्निचरवर वीतभर धूळ साचली होती. कापलेले प्लायवूड, सिलिंगच्या पट्ट्या, बांबू, काठ्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. काही फर्निचर खराब झाले होते.

काम सुरू होते तोपर्यंत कोरोना आला, नंतर अध्यक्ष आणि संचालकांमध्ये वाद सुरू झाले, आरोप-प्रत्यारोप झाले, अध्यक्ष बदलाच्या हालचाली झाल्या, कार्यकारिणीची बैठकच झाली नाही आणि मे २०२१ रोजी कार्यकारिणीची मुदत संपली. कारभाऱ्यांच्या या वादात आता वास्तूची अवस्था ‘अरे, ही नवी इमारत होती?’ असा प्रश्न पडण्यासारखी झाली आहे.

असे होते नियोजन

येथील फर्निचर, सिलिंग, विद्युत व्यवस्था, रंगकाम, एसी असे वेल फर्निश्ड काॅर्पोरट ऑफिसमध्ये रूपांतर करण्यात येणार होते. येथे महामंडळाचे कार्यालय तसेच चित्रीकरणासाठीही त्याचा उपयोग केला जाणार होता. त्यासाठी सुरुवातीला २५ लाखांचे बजेट ठरले; पण काही संचालकांनी त्याला विरोध करून कमी रकमेत करूया असे सांगितले. पहिल्या टप्प्यात १७ ते १८ लाखांचे जवळपास ४० टक्के काम झाले.

एकमेकांच्या पायात पाय

या वास्तूचे काम करून घेण्यासाठी सर्वाधिकार स्थानिक संचालकांना दिले होते. त्यासाठी निविदा काढून एकाच व्यक्तीला ठेका दिला असता तर आज कार्यालय नव्या इमारतीत थाटले गेले असते; पण असे झाले नाही. प्रत्येक कामासाठी वेगवेगळा माणूस ठरवला गेला. एका संचालकाने ठरवलेल्या माणसाला दुसऱ्याने विरोध करायचा असे एकमेकांच्या पायात पाय घालण्यामुळे वास्तूचे काम रखडले. कार्यालयासाठी भांडलेले आता त्याकडे ढुंकून बघायला तयार नाहीत.

कोल्हापूरला काॅर्पोरेट कार्यालय व्हावे अशी इच्छा होती; पण स्थानिक संचालकांमुळे काम ठप्प झाले. अजूनही वेळ गेेलेली नाही. सर्वांनी एकत्र येत कामाचे ऑडिट करून पुढील काम सुरू करण्याचा ठराव करावा. कार्यकारिणीची मुदत संपल्याने व न्यायप्रविष्ट बाब असल्याने कितपत रक्कम खर्च करता येते यावर धर्मादायकडे विचारणा करून आम्ही सर्वप्रकारे मदत करायला तयार आहोत. - मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
 

Web Title: Dilapidated condition of the three crores Vastu in the dispute in the film corporation in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.