Kolhapur LokSabha Constituency: संचालकांसमोर मोठे कोडे, आघाडीचे दोन नेते दोन्हीकडे
By राजाराम लोंढे | Published: April 3, 2024 01:15 PM2024-04-03T13:15:52+5:302024-04-03T13:16:16+5:30
जिल्हा बँक, ‘गोकुळ’सह सर्वच संस्थात पेच
राजाराम लोंढे
कोल्हापूर : ‘गोकुळ’, जिल्हा बँक, शेतकरी संघ, कोल्हापूर बाजार समितीसह बहुतांशी सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी हातात हात घालूनच काम केले; पण लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर वेगवेगळी भूमिका आल्याने सहकारी संस्थांतील संचालकांची गोची झाली आहे. दोन नेते दोन्हीकडे, सांगा जायचे कोणाकडे? अशी काहीसी अवस्था असून ‘गोकुळ’चे ११ व जिल्हा बँकेचे १५ संचालक मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत सध्या तरी दिसतात.
‘गोकुळ’ व जिल्हा बँक या दोन संस्था जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या आहेतच, त्याचबरोबर राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. या संस्थांवर ज्याची पकड त्याचे जिल्ह्यात राजकीय वजन, असेच समीकरण आहे. लोकसभा निवडणुकीत या संस्थेतील सत्तेचा थेट परिणाम होतो.
संचालकांबरोबरच कर्मचाऱ्यांची मदत होत असल्याने येथील सत्तेला महत्त्व आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे दोन दिशेला आहेत. मंत्री मुश्रीफ यांच्यावर ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’मधील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या तर आमदार पाटील यांना शाहू छत्रपती व आघाडी देईल त्या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी आहे.
उमेदवारी अर्ज दाखल व्हायचे असले तरी महायुती व महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम होऊ लागले आहे. आगामी महिन्याभरात हवा आणखी गरम होणार असून, प्रचार टाेकाला जाणार आहे. यावेळी, ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेतील सत्तेचा वापर निर्णायक ठरणार आहे. येथील यंत्रणा व त्यांच्या माध्यमातून लावलेल्या जोडण्याच गुलालापर्यंत नेणार आहे. अशा परिस्थितीत येथील संचालकांची गोची झाली आहे.
‘गोकुळ’च्या २४ संचालकांपैकी (३ स्वीकृत) सध्या १२ संचालक हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत तर ११ मंत्री मुश्रीफ यांच्याबरोबर आहेत. डॉ. चेतन नरके हे स्वत:च रिंगणात आहेत. जिल्हा बँकेतील २१ पैकी तब्बल १५ संचालक मंत्री मुश्रीफ यांच्याकडे आहेत. तर पाच संचालक आमदार पाटील यांच्यासोबत आहेत. ए. वाय. पाटील यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. सत्तेत येताना दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आलो आणि नेतेच दोन्हीकडे गेल्या आता जायचे कोणाकडे? अशी अवस्था संचालकांची झाली आहे.
कोण कोणासोबत आहेत..
गोकुळ :
महायुती : अरुण डोंगळे, नविद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले, रणजित पाटील, अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, एस. आर. पाटील, शौमिका महाडिक, अजित नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव.
आघाडी : विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, अंजना रेडेकर, अंबरिश घाटगे.
जिल्हा बँक :
महायुती : हसन मुश्रीफ, विनय कोरे, संजय मंडलिक, निवेदिता माने, अमल महाडिक, राजेश पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सुधीर देसाई, रणवीर गायकवाड, राजेंद्र पाटील-यड्रावकर, संतोष पाटील, अर्जुन आबीटकर, रणजित पाटील, विजयसिंह माने.
आघाडी : सतेज पाटील, पी. एन. पाटील, राजू आवळे, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर.