‘गोकुळ’मध्ये शिंदे-फडणवीस समर्थक नेत्यांची कोंडी, चौकशी कोणाच्या कारभाराची करायची?; अधिकाऱ्यांपुढे पेच?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 12:31 PM2023-01-19T12:31:51+5:302023-01-19T12:32:36+5:30
‘गोकुळ’च्या विरोधी संचालिका शौमिका महाडीक यांच्या मागणीनुसार दूध संघाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कारभाराचे चाचणी लेखापरीक्षण होणार
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या विरोधी संचालिका शौमिका महाडीक यांच्या मागणीनुसार दूध संघाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कारभाराचे चाचणी लेखापरीक्षण होणार आहे. मात्र, संघातील सत्तेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक नेत्यांचे चार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार विनय काेरे यांचे दोन असे सहा संचालक आहेत. त्यातच खासदार संजय मंडलीक हे सत्तारूढ गटाचे नेते असताना नेमक्या कोणाच्या कारभाराची चौकशी होणार? याबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश लेखा परीक्षा मंडळ (पदुम), मुंबई रा.सं. शिर्के यांनी दिले. यासाठी विशेष लेखापरीक्षक वर्ग, सहकारी संस्था (दुग्ध) अहमदनगर बी.एस. मसुगडे यांची नियुक्ती केली आहे. दूध संघात सर्वपक्षीय नेत्यांची सत्ता आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या सत्तेत असलेले जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय काेरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आमदार प्रकाश आबीटकर, खासदार संजय मंडलीक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचीच सत्ता आहे.
या नेत्यांचे सहा संचालक आहेत. भाजपच्या नेत्या शौमिका महाडीक यांच्या तक्रारी अर्जानुसार चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश लेखा परीक्षा मंडळ (पदुम) यांनी दिले, मात्र या आदेशाने या नेत्यांची कोंडी झाली आहे.
चौकशी अधिकाऱ्यांपुढे पेच?
‘गोकुळ’च्या चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश निघून दोन दिवस झाले आहेत. आदेश काढल्यापासून दहा दिवसांत अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, मंगळवारपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयातून राजकीय घडामोडींना वेग आल्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाल्यानेच विलंब होत असल्याची चर्चा आहे.