ही दोस्ती तुटायची नाय! ज्या चौकात धार्मिक दंगल; तिथे हिंदू-मुस्लीम ऐक्य, वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 06:08 PM2023-06-11T18:08:01+5:302023-06-11T18:08:31+5:30
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये दंगलीच्या घटना घडत आहेत.
कोल्हापूर - छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत सर्वधर्म समभाव या विचारांवर चालणाऱ्या लोकांची कमी नाही. त्यातीलच दोन मित्र, दिलीप चौगुले आणि गनी तांबोळी, या दोघांचा धर्म वेगळा परंतु मैत्री धर्माहून अधिक मजबूत आहे. मागील २३ वर्षापासून कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पान शॉप चालवतात. कधीही त्यांचा धर्म व्यवसायाच्या आड आला नाही. कोल्हापूरात जिथं धार्मिक हिंसा घडली, दगडफेक झाली त्याच भागात हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले दोघे मित्र पानाचे दुकान चालवतात.
दिलीप चौगुले आणि गनी तांबोळी हे ३५ वर्षापासून मित्र आहेत. प्रत्येक सुखदुखात एकमेकांसोबत ताकदीने उभे राहतात. सुरुवातीला गनी तांबोळी पान विकत होता तर दिलीप चौगुले याचे पानाचे दुकान होते. या व्यवसायातून दोघेही एकमेकांना चांगले ओळखू लागले. हळूहळू या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मामू पानाचे दुकान सुरू करत व्यवसायात भागीदारी केली. मागील २३ वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. दोघेही प्रामाणिकपणे काम करतात. कायम एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जातात.
दोन्ही कुटुंबांमध्ये जात-धर्म कधीच येत नाही
ते दोघे एकमेकांची चेष्टा करतात आणि आनंद वाटून घेतात. दोघांचे कुटुंबही त्यांच्याशी जोडले गेले आहे. जवळच्या नात्यापेक्षाही मोलाचे नाते त्यांनी बांधले आहे. चौगुले आणि तांबोळी कुटुंबातील सदस्य एकाच कुटुंबातील असल्यासारखे राहतात. दोन कुटुंबांमध्ये जात-धर्म कधीच येत नाही. 'रमजान' असो की 'दिवाळी', दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होऊन सण साजरे करतात. एकाच्या कपाळावर कुंकू आणि दुसऱ्याच्या डोक्यावर गोलाकार पांढरी टोपी हा त्यांचा रोजचा पेहराव.
दंगल झालेल्या भागात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अवघ्या काही अंतरावर चौगुले आणि तांबोळी काका गेल्या २३ वर्षांपासून जात-धर्म बाजूला ठेवून पान दुकान चालवत आहेत. दुकानात पान खायला येणारा प्रत्येक ग्राहक त्यांच्या समन्वयाचे कौतुक करतो. कोल्हापुरात पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक कुतुहलाने चौगुले, तांबोळी चाचा यांचे फोटो काढतात.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये दंगलीच्या घटना घडत आहेत. ज्या कोल्हापुरात अनेक दशके पुरोगामी विचारांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात त्या कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम दंगलीमुळे या विचाराला तडा गेला आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पण दुसरीकडे चौगुले, तांबोळी यांच्यासारख्या कट्टर मित्रांची मैत्री पाहता पुरोगामी विचारसरणीला अजून तडा गेलेला नाही, असे नक्कीच म्हणता येईल.