समाज कल्याण विभागाच्या योजना मागासवर्गीय समाजातील घटकांपर्यंत पोहचविणे आवश्यक : दिलीप कांबळे
By admin | Published: May 15, 2017 05:35 PM2017-05-15T17:35:39+5:302017-05-15T17:35:39+5:30
सिंधुदुर्गात विविध विकास कामांचा आढावा
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी दि. १५ : समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीय समाजातील घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात या योजना त्यांच्या पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे केले.
येथील विश्रामगृहावरील सभागृहात आयोजित बैठकीत सामाजिक न्याय, अल्प संख्यांक विकास विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सावळकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त जे. एम. चाचरकर उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाच्या विकास योजना लाभार्थीपर्यंत पोहचवून त्यांना लाभ मिळावा यासाठी विभागाने विशेष प्रयत्न करावेत असे सांगून कांबळे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विहित वेळेत मिळावी यासाठी विभागाने प्रयत्न करावे. तसेच बचत गटांच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी बचत गटांचे मेळावे आयोजित करावेत.
देवगड येथील वस्तीगृहाचे काम लवकरात-लवकर पूर्ण करुन येत्या शैक्षणिक २0१७ पासून या वस्तीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु होईल यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रयत्नशील राहावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध विकास महामंडळ तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा मंत्री महोदयांनी घेतला.
या बैठकीला माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्हटकर, कोकण आर्थिक विकास महामंडळाचे साळस्कर, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या श्रीमती नाईक आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.