दिलीपतात्या राष्ट्रवादीवर नाराज
By admin | Published: October 26, 2016 11:38 PM2016-10-26T23:38:19+5:302016-10-26T23:38:19+5:30
निष्ठेपेक्षा पैसाच झाला श्रेष्ठ! : सोशल मीडियावर मतप्रदर्शन
सांगली : राजकारणात निष्ठा, कर्तृत्व आणि चारित्र्य याला किंमत नाही. शेवटी पैसाच श्रेष्ठ आहे. वाममार्गाने पैसा मिळविणाऱ्यांसाठी राजकीय नेते पायघड्यासुद्धा घालतील, अशी खंत आ. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक व जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी बुधवारी सोशल मीडियावर व्यक्त केली. अनेकांनी त्यांच्या भावनांना प्रतिसाद देत, ही नाराजी व्हायरल केली.
सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी दिलीपतात्या पाटील यांनी राष्ट्रवादीकडे प्रयत्न केले होते. पक्षातून दुसरे कोणाचेही इच्छुक म्हणून नाव नव्हते. अचानक राष्ट्रीय समाज पक्षातून शेखर गोरे यांना राष्ट्रवादीने खेचून उमेदवारी दिली. गोरे यांचा अधिकृत प्रवेश होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने त्यांच्या प्रचारालाही सुरुवात केली. मंगळवारी गोरे यांनी इस्लामपूर, आष्टा आणि सांगलीत येऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना मतदान करण्याचे आवाहन खुद्द जयंत पाटील करीत होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या दिलीपतात्यांच्या पदरी निराशा आली.
राजारामबापू पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून दिलीपतात्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. राजारामबापूंच्या पश्चात त्यांनी जयंतरावांशी आणि पर्यायाने राष्ट्रवादीशी निष्ठा राखली. तालुकास्तरावरील संस्थांचे प्रतिनिधीत्व करीत राज्यातील वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली. सध्या ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. चाळीस वर्षांच्या राजकीय व संस्थात्मक कामाचा दाखला देत त्यांनी पक्षाकडे विधानपरिषदेची उमेदवारी मागितली होती. पक्षाचे या मतदार संघात संख्याबळही अधिक आहे. तरीही ऐनवेळी शेखर गोरे यांना आयात करून उमेदवारी देण्यात आली. या गोष्टीचा धक्का त्यांना बसला.
मंगळवारी गोरे यांच्या प्रचाराला सुरुवात झाल्यापासून दिलीपतात्यांनी मौन बाळगले होते. बुधवारी दुपारी त्यांनी फेसबुकवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांची ही खंत सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाली. जयंत पाटील यांचे ते कट्टर समर्थक असून, त्यांना डावलल्याबद्दल अनेक समर्थकांनी राष्ट्रवादी तसेच राजकारण्यांच्या निवड पद्धतीवर जोरदार टीका केली. (प्रतिनिधी)
अशी व्यक्त केली खंत...
‘राजकारणात निष्ठा, काम व चारित्र्य याला किंमत नाही. शेवटी पैसा श्रेष्ठ आहे, हे मला चाळीस वर्षांनी समजले. दरोडे घालून, भ्रष्टाचार करून वाम मार्गाने पैसे मिळवा, म्हणजे राजकारणी नेते तुम्हाला पायघड्या घालतील’, अशा शब्दात दिलीपतात्या पाटील यांनी खंत व्यक्त केली.
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या ताकदीची ‘अर्थ’पूर्ण चाचपणी सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त खरे ठरले. दिलीपतात्या पाटील यांनी याच गोष्टीवरून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ही निवडणूक आता मोठ्या ‘अर्थ’कारणामुळे चर्चेत आली आहे.
दिलीपतात्यांनी व्यक्त केलेल्या भावनांना त्यांच्या समर्थकांसह जयंत पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते, कॉँग्रेस, शेतकरी संघटना यासारख्या अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शविला. पक्षीय निवड पद्धत आणि बिघडलेले राजकारण यावरही अनेकांनी तोंडसुख घेतले.