दीनानाथसिंह यांची संघर्षगाथा कुस्तीगिरांसाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:59+5:302021-03-28T04:23:59+5:30
मान्यवरांच्या भावना : ‘लाल माती’ आत्मचरित्राचे शानदार प्रकाशन लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेला ...
मान्यवरांच्या भावना : ‘लाल माती’ आत्मचरित्राचे शानदार प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेला एक मुलगा.. गंगा नदीचे पावित्र्य लाभलेली वाराणसी ही जन्मभूमी सोडून महाराष्ट्रात येतो, तबेल्यात राहून कष्टाने कुस्तीचा सराव करतो आणि हिंदकेसरी हा सर्वोच्च मानाचा किताब पटकावतो आणि पंचगंगेला कर्मभूमी मानून कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवतो... अशा पैलवान दीनानाथसिंह यांची लोकमतने प्रसिद्ध केलेली संघर्षगाथा कुस्तीगिरांसाठी प्रेरणादायी आहे, अशा भावना शनिवारी मान्यवरांनी व्यक्त केल्या. निमित्त होतं दीनानाथसिंह यांचा आयुष्यपट उलगडणाऱ्या व लोकमतचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘लाल माती’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे.
राजर्षी शाहू स्मारक भवनात मान्यवरांच्या मांदियाळीत व कुस्तीगिरांच्या साक्षीने झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, सांगली जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी दीनानाथसिंह यांना हिंदकेसरी हा किताब मिळून ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा नोटांचा हार, राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा, शाल, श्रीफळ, त्यावेळी मिळालेली चांदीची गदा व हिंदकेसरीचा किताब देऊन सत्कार करण्यात आला. समाजाच्या विविध स्तरांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते. लोकमत, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ व ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने हा समारंभ झाला.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ज्या भूमीला इतिहास असतो तिथे भूगोल घडतो. कोल्हापूरला कला, क्रीडा, संस्कृतीचा इतिहास आहे. आज नव्या पिढीला संघर्ष न करता यश हवे असते. त्यांनी दीनानाथसिंह यांचे हे आत्मचरित्र वाचले तर संघर्ष कळेल. शाहू महाराजांमुळे कोल्हापुरात कुस्तीची परंपरा निर्माण झाली, तो वारसा जपण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. हे पुस्तक सर्व तालमींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सहकार्य करू.
आमदार विनय कोरे म्हणाले, ‘लाल माती’ हे पुस्तक म्हणजे महान कर्मयोग्याचा व त्याच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान आहे. दीनानाथसिंह यांनी कोल्हापूरच्या भूमीचा देशपातळीवर सन्मान घडवून आणला आहे. कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेविषयीचा अभिमान, संघर्ष, कष्ट, सराव, सातत्य ठेवताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वावर डाग लागू दिला नाही.
अध्यक्षीय भाषणात मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, दीनानाथसिंह यांनी हिंदकेसरी जिंकली त्यावेळी राजर्षी शाहू महाराज असते तर त्यांनी तुमची हत्तीवरून मिरवणूक काढली असती. उत्तर प्रदेशातून एक मुलगा कोल्हापुरात येतो, कुस्तीत नावलौकिक मिळवतो आणि या मातीशी निष्ठा ठेवतो आणि अस्सल कोल्हापूरकर म्हणून आज त्याचा सन्मान होतो, ही अभिमानाची गोष्ट आहे.
प्रास्ताविकात संपादक भोसले म्हणाले, दीनानाथसिंह हे राजर्षी शाहू महाराजांच्या वाटेने चालणारे, त्यांची परंपरा जपणारे शिलेदार आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले आहे. आत्मचरित्र प्रसिद्ध होणारे ते पहिले पहिलवान आहेत. लोकमतच्या माध्यमातून हे घडले, शाहूंची, कुस्ती परंपरेची सेवा करण्याची, दिलदार माणसाचा कोल्हापूरकर म्हणून सन्मान करण्याची संधी मिळाली, हे लोकमतचे भाग्य आहे.
विश्वास पाटील म्हणाले, भारताला पहिले पाच हिंदकेसरी कोल्हापूर व सांगलीने दिले. त्यापैकी दीनानाथसिंह यांचे आत्मचरित्र लोकमतच्या भक्कम पाठिंब्यामुळे लिहू शकलो. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. बी. पाटील यांनी आभार मानले.
हिंदकेसरीच्या मैदानात लोकमतची घोषणा
दीनानाथसिंह यांनी लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांची आठवण सांगितली. २८ मार्च १९७१ ला झालेल्या अंतिम लढतीवेळी मैदानात जवाहरलालजी दर्डा यांनी मी नागपूरला लोकमत सुरू करत असल्याची घोषणा केली होती. त्याअर्थाने लोकमतच्या वाटचालीचाही हा सुवर्णमहोत्सव आहे.
लोकमतच्या भूमिकेचे कौतुक
घडलेल्या घडामोडींची नुसत्या बातम्यापुरती पत्रकारिता मर्यादित न ठेवता लोकमतने चांगल्या लोकांचे जीवन पुस्तक रूपाने समाजासमोर आणले हे कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांनी आवर्जून सांगितले. लोकमतचे प्रमुख विजय दर्डा, राजेंद्र दर्डा व सर्व दर्डा कुुटुंबीय यांचे त्यासाठी कोल्हापूरकरांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो.
---
दीड लाखाची मदत
दीड वर्षापूर्वी दीनानाथसिंह यांच्या उपचारासाठी लोकमतने केलेल्या आवाहनानंतर भरघोस निधी मिळाला. या कार्यक्रमातही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी फाउंडेशनच्या वतीने एक लाखाचा निधी जाहीर केला. प्रयाग चिखली येथील एस. आर. पाटील व पांडुरंग पाटील यांनी ५० हजारांचा धनादेश दीनानाथसिंह यांना सुपूर्द केला.
---
मरणाच्या दारातून परत आलो...
दीनानाथसिंह यांनी लाघवी शैलीत हिंदीमिश्रित मराठीत मनोगत व्यक्त करताना कोल्हापूरच्या मातीचे ऋण व्यक्त केले. ते म्हणाले, आजचा हा आनंददायी सोहळा बघायचा होता म्हणून मरणाच्या दारातून परत आलो. मेरा जनम तो गंगामैय्या के किनारे हुआ लेकीन कर्मभूमी पंचगंगामैय्या की भूमी है. वाराणसीतून मुंबई, सांगली असा प्रवास करत कोल्हापुरात आलो. गंगावेश तालमीत जोर-बैठका मारल्या महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीचा किताब मिळाला आणि भैयाचा पोरगा अण्णा झाला. लोकमतने माझे आत्मचरित्र प्रकाशित करून कृतकृत्य केले.
---
कुस्तीला कमी पडू देणार नाही.
मनोगतात दीनानाथसिंह यांनी हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी यांच्या विधवा पत्नींची व्यथा सांगितली. तसेच बाळ गायकवाड यांचे स्वप्न असलेल्या मोतीबाग तालमीचे नूतनीकरण, तालमी व पहिलवानांपुढील अडचणींची माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी कुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.