विठ्ठलाच्या ओढीने दिंड्या पंढरपूरला रवाना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:47 PM2019-07-03T14:47:39+5:302019-07-03T14:48:13+5:30
हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ मृंदगाचा गजर आणि विठू नामाचा अखंड जप करत कोल्हापूर जिल्ह्यातील दिंड्या बुधवारी पंढरपूरसाठी रवाना झाल्या. यानिमित्ताने शहरात आषाढी एकादशीच्या आगमनाचे रंग भरले.
कोल्हापूर : हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ मृंदगाचा गजर आणि विठू नामाचा अखंड जप करत कोल्हापूर जिल्ह्यातील दिंड्या बुधवारी पंढरपूरसाठी रवाना झाल्या. यानिमित्ताने शहरात आषाढी एकादशीच्या आगमनाचे रंग भरले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल म्हणजे भाविकांची माऊली. कष्टकरी, बहुजनांच्या या देवाची आषाढी एकादशी म्हणजे वर्षातील सर्वात मोठा सोहळा. यंदा १२ तारखेला आषाढी एकादशी आहे. यानिमित्त संत तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या पालख्यांनी आठ दिवसांपूर्वीच प्रस्थान ठेवले आहे.
आता एकादशीला दहा दिवस राहिल्याने कोल्हापुर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून गावागावातून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होत आहेत. जिल्ह्यासह कोल्हापुर शहरातील विश्वपंढरी तसेच विविध मंडप, मंडळांच्यावतीने या दिंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यात दिवसभरात २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास केला जातो. या दहा दिवसात दिंडी सहा ठिकाणी मुक्कामाला थांबते.