दिनकर पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षही सुनेच ?

By Admin | Published: October 13, 2015 12:36 AM2015-10-13T00:36:01+5:302015-10-13T00:38:57+5:30

रसिकांकडून कार्यक्रमांची अपेक्षा : मराठी चित्रपटसृष्टीची चार दशके गाजविली

Dinkar Patil's birth centenary year too? | दिनकर पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षही सुनेच ?

दिनकर पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षही सुनेच ?

googlenewsNext

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या ग्रामीण चित्रपटांनी ठसा उमटविणारे चित्रपट दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचे जन्मशताब्दी वर्षही कोणत्याच कार्यक्रमाविना सुनेच जाणार काय, असा सवाल चित्रपट रसिक व्यक्त करीत आहेत. ६ नोव्हेंबर ला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत आहे. दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आठवण ‘लोकमत’ने सर्वप्रथम करून दिली, तेव्हा कोठे कोल्हापुरात काही कार्यक्रम झाले. तो सोहळा उत्तमरीत्या पार पडल्यानंतर आता दिनकर द. पाटील यांच्या जन्मशताब्दीचीही आठवण कोल्हापुरकरांना करावी लागणार की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून काही कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा चित्रपट रसिकांकडून व्यक्त होत आहे. मूळचे कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील बेनाडी गावचे असलेल्या पाटील यांनी कोल्हापुरातून कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. मा. विनायक यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. कोल्हापुरातील चित्रनगरी, शालिनी सिनेटोन, जयप्रभा या स्टुडिओंना नावारूपास आणण्यामध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. पाटील यांचे ‘पाटलाचे पोर’ हे आत्मचरित्र १९८४ मध्ये प्रकाशित झाले असून, त्याचा अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवाद झाला आहे. तथापि, सध्या मराठीतच या पुस्तकाची आवृत्ती उपलब्ध नाही. या आत्मचरित्राची आवृत्ती पुन्हा प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून महोत्सवाबरोबरच कार्यक्रम होणे गरजेचे आहे.

राम राम पाव्हणं, शारदा, पाटलाचं पोर, माय बहिणी, नवरा म्हणून नये आपला, कामापुरता मामा, मल्हारी मार्तंड, कोर्टाची पायरी, कुंकू माझं भाग्याचं, सुलक्षणा, कुलदैवत, माझी आई, संताजी धनाजी, अधिकार, शिवरायांची सून ताराराणी, कुंकवाचा टिळा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. आपल्या ग्रामीण ढंगात चित्रपटांमधून तत्कालीन सामाजिक विषयावर त्यांनी भाष्य केले.
१९५० ते १९९० या चार दशकांच्या कालखंडात त्यांनी ३६ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्याचबरोबर ६० पेक्षा अधिक चित्रपटांच्या लेखनामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या काही गाजलेल्या पटकथांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.


मी मराठीत पहिल्यांदा काम केले ते दिनकर द. पाटील यांच्या चित्रपटात. त्यांनी आपल्या चित्रपटांतून ग्रामीण महाराष्ट्र दाखवितानाच सामाजिक आशयही दिला. मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांचे हे योगदान कायम स्मरणात राहील.
- सुभाष भुरके, कार्यवाह, मराठी चित्रपट महामंडळ


मराठी चित्रपटसृष्टीला ज्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे स्मरण पहिल्यांदा करवीरकरांनी केले पाहिजे. ज्यांनी खस्ता खाल्या त्या काही दिग्गजांची जन्मशताब्दी करणे ही चित्रपट व्यावसायिकांची जबाबदारी आहे. प्रत्येकवेळी सगळ््याच गोष्टी करणे हे महामंडळालाही शक्य नाही. त्यामुळे त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा.
- यशवंत भालकर,
दिग्दर्शक

Web Title: Dinkar Patil's birth centenary year too?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.