Kolhapur: पंचगंगा तिरी लेझरचा उत्सव...गायब झाला दीपोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:18 PM2023-11-29T12:18:16+5:302023-11-29T12:18:31+5:30
उत्सवातील मांगल्य हरवले, लोकांतून संतप्त प्रतिक्रिया
आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर: त्रिपुरारी पौर्णिमा व दीपोत्सव या दिवशी असंख्य कोल्हापूरकरांचे पाय हे पंचगंगा नदी कडे वळतात. मात्र, यावर्षी कोल्हापूरकरांना पहाटे पहाटे दिव्यांऐवजी शार्पीच्या व लेझर लाइटचा उत्सव पंचगंगा नदीवर पाहायला मिळाला. याबद्दल बऱ्याच जणांनी संयोजकांचे अस्सल कोल्हापुरी भाषेत आभारही मानले.
मला आठवतंय २००१ साली मी वडिलांबरोबर पहाटे नदीवर दीपोत्सवाचे फोटो घेण्यासाठी गेलो. मावळतीला झुकणारा तांबुस लालसर रंगाचा चंद्र आणि त्याचे नदीत तरंगणारे प्रतिबिंब मी पाहात होतो. मंडळाचे कार्यकर्ते व निवड दर्दी कोल्हापूरकर दीपोत्सवाचा आनंद लुटण्याकरिता हजर होते. परिसरातील सर्वच लाइट घालवले होते. संस्कार भारतीची व ठिपक्यांच्या दोनच मोठ्या रांगोळ्यावर शेवटचा हात सुरू होता, तोही मशालीच्या उजेडात आणि आरतीनंतर दिवे लावण्यास सुरुवात झाली. कोणतेही गडबड वा गोंधळाविना १५ ते २० मिनिटात संपूर्ण पंचगंगा नदीघाट उजळला.
पाण्यातील सर्व मंदिरे, दीपमाळ अगदी धोबी घाटासमोरील ब्रम्हदेवाचे मंदिरावर ही कार्यकर्त्यांनी अगदी लयबद्ध पद्धतीत दिवे प्रज्वलित केले. समाधी मंदिरातील उंच शिखरावरही लीलया दोन कार्यकर्ते दिवे प्रज्वलित करत होते. सर्व दिवे लावून झाल्याक्षणी निवडक सुंदर फटाक्यांनी आसमंत उजळला. आपसुकच सर्वांच्या कानांवर ‘वाह’ असा आवाज आला. इतक्यात सुमधुर गायन सुरू झाले. मित्रांनो, नक्की सांगतो, अंधारात मंद दिव्यांच्या व मशालीच्या उजेडात संपूर्ण परिसर झगमगत, सुरेल शास्त्रीय संगीत आणि पहाटेच्या वेळी दिव्यांच्या उबेत पंचगंगा नदीकाठी वाहणारे थंड वारे एका वेगळ्याच दुनियेत आल्याचे अनुभवत होतो.
मात्र, यावर्षी जो दीपोत्सव, अहो दीपोत्सव कसला तारतम्य नसलेला इव्हेंट वाटला. पहाटे चार वाजता कराओके वर ‘यारा तेरा याराना व चंद्रा’सारखी किळस वाटावा, अशा आवाजात गाणी गायक गात होते. देवदेवतांच्या रांगोळ्या रस्त्यावर काढलेल्या व या रांगोळ्या दिसाव्या म्हणून रस्त्यावरच उंच मचाण बांधून त्यावर मोठे लाइट लावलेले. डोळे दीपतील नव्हे तर खराब होतील, असा शार्पी लाइट नदीघाटावर प्रवेश करताच दिसत होता. अचानक दिवे लावायला सुरुवात केली. अजून दिवे लावून पूर्ण होण्याआधीच आकाशातील फटाके लावून कार्यकर्ते रिकामे झाले.
पिकनिक पॉईंटवरून टाकलेला हिरवा लेझर तर सर्व दीपोत्सवाची वाट लावत होता. आम्ही दिव्यांचा प्रकाश अनुभवायला येतोय हे लाइट, लेझर, रस्त्यातच अडथळा करणाऱ्या संबंध व कलात्मकता नसणाऱ्या रांगोळ्या बघायला येत नाही हे माइकवर जाऊन ओरडून सांगावेसे वाटत होते. लाइट व लेझरवाल्यांना थोडा वेळ बंद करा म्हटले तर... ‘बंद करत नाही, काय करायचे ते करा,’ असे उर्मट उत्तर ते देत होते. ही परंपरा पुढच्या पिढीला या संयोजक कार्यकर्त्यांनी दिली तर काही वर्षात आपण पहाटे नदीकाठी दिव्यांऐवजी लेझर शोची स्पर्धा पाहू व डॉल्बीच्या ठेक्यावर मिरवणुकीप्रमाणे डान्स करत कोल्हापूरकरांना हे थिरकवतील. पुढच्या वर्षी तरी या कार्यकर्त्यांना दिव्यांच्या पारंपरिक जादुई प्रकाशात हा दीपोत्सव आयोजित करावा, असे एक कोल्हापूरकर म्हणून वाटते.