Kolhapur: कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफ-समरजित यांच्यातच थेट लढत
By विश्वास पाटील | Published: August 7, 2024 06:31 PM2024-08-07T18:31:52+5:302024-08-07T18:32:25+5:30
समरजित तुतारी फुंकण्याची शक्यता ठळक; संजय घाटगे यांची अनाकलनीय माघार
विश्वास पाटील
कोल्हापूर : उद्धवसेनेचे नेते व माजी आमदार संजय घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच तलवार म्यान केल्यामुळे कागल मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे यांच्यातच थेट कुस्ती होण्याची शक्यता ठळक झाली आहे. समरजित यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारी फुंकण्याची ऑफर आहे. त्यांनी तसा निर्णय घेतला तर या लढतीला वेगळीच धार येणार आहे. त्यांनी भाजप प्रेमापोटी अपक्ष लढायचे ठरवल्यास महाविकास आघाडीला या मतदारसंघात आजच्या घडीला तरी उमेदवारच नाही. समरजित यांनी सोमवारी मुरगूडमध्ये आपण लढणार हे नक्की आहे, एबी फॉर्म कोणत्या पक्षाचा असेल हीच उत्सुकता आहे, असे म्हटले आहे. याचा अर्थ ते अपक्ष नव्हे तर कोणत्या तरी पक्षाकडूनच लढतील हे स्पष्टच आहे. आणि त्यांच्यापुढे महाविकास आघाडीशिवाय दुसरा पर्यायच नाही.
समरजित घाटगे यांची भाजपच्या राज्य नेतृत्वाशी अत्यंत जवळीक आहे. संघटनेतही त्यांना चांगले स्थान आहे. त्यामुळे ते भाजपला सोडून तुतारी फुंकतील का, अशीही साशंकता लोकांच्या मनात आहे. परंतु अपक्ष लढून महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा हे घडणार नाही. कारण त्यात आघाडीचा काय फायदा नाही. त्यामुळे एकतर त्यांना आघाडीची उमेदवारी घ्यावी लागेल किंवा मग तिरंगी लढत होईल. संजय घाटगे नाही म्हटल्याने आघाडीला ताकदीचा उमेदवार शोधावा लागेल.
- कागलच्या आजपर्यंतच्या लढतीत जेव्हा लढत तिरंगी होते तेव्हाच ती मुश्रीफ यांना सोपी जाते, दुरंगी लढतीत त्यांचा कस लागतो हे माहीत असतानाही संजय घाटगे यांची माघार होणे आणि त्याचे मुश्रीफ यांनी स्वागत करणे यामागील त्यांचे गणित काय असेल याबद्दल नक्कीच उत्कंठा आहे.
- गेल्या निवडणुकीत याच मुश्रीफ यांनी शिवसेनेची उमेदवारी समरजित घाटगे यांना मिळणार नाही आणि तिथे संजय घाटगे हेच त्या पक्षाकडून कसे रिंगणात राहतील यासाठी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या माध्यमातून जोडण्या लावल्या व त्याचा परिणाम निकालात दिसला. त्याच मुश्रीफ यांची या निवडणुकीतील भूमिका मात्र त्याच्या उलटी आहे.
- संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिला म्हणून त्यांचा सगळाच गट जसाच्या तसा मुश्रीफ यांच्या पाठीशी राहील ही शक्यता धूसर आहे. निवडणुकीत तसे होत नाही आणि घाटगे यांना पडलेली मते जरी त्यांना मानणारी असली तरी त्यामध्ये शिवसेनेची ताकद हीदेखील तितकीच महत्त्वाची आहे.
- लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शाहू छत्रपती यांना कागलने चांगले मतदान दिले. त्यांच्या प्रचारात अंबरीश घाटगे सक्रिय होते. त्यामुळे तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असाही एक प्रवाह होता. परंतु वडिलांनी आधीच हात वर केल्याने अंबरीश हेदेखील पाच वर्षे मागे गेले. शिवाय महाविकास आघाडीत राहून त्यांना मुश्रीफ यांना मदत करता येणार नाही. मग एकतर शिंदेेसेना किंवा भाजप हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर असतील.
- मुश्रीफ यांच्याकडून लाभ घेऊन त्यांना लढत सोपी व्हावी म्हणून मी लढतो हा शिक्का पुसण्यासाठी आपण निर्णय घेतल्याचे संजय घाटगे सांगतात, परंतु कुणी किती लाभ दिला आणि किती घेतला हे जाहीर सभेत शपथेवर सांगितले म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत. आणि तुम्ही लोकांशी, भूमिकेशी प्रामाणिक होता म्हणूनच ५५ हजार लोकांनी तुम्हाला मते दिली, कार्यकर्त्यांनी हाडाची काडे केली हे त्यांनी अव्हेरू नये.. या मतांचे मोल मोठे आहे.
- भाजपच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्चस्वाला केंद्रीय नेतृत्वाकडून काही प्रमाणात शह दिला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत ते जसे अपक्षांच्या मागे राहिले तसे राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांनीच तुम्हाला आमदार व्हायचे असेल तर तुमचा पक्ष तुम्ही निवडा अशा स्वरूपाची लाइन समरजित, चंदगडच्या शिवाजीराव पाटील यांना क्लेअर करून दिल्याचे समजते. त्यामुळेच समरजित हे तुतारी फुंकण्याच्या तयारीत असल्याच्या घडामोडी आहेत.
- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मुश्रीफ त्यांना सोडून गेल्याचे चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयोग त्यांनी लोकसभेत केला व त्याचा लक्षणीय फायदा झाला. तसाच प्रयोग ते या मतदारसंघातही करू इच्छितात. त्यांच्याबद्दल कागलमध्ये नक्कीच क्रेझ आहे. तशा हालचाली असल्यानेच मुश्रीफ यांनी सावध होऊन जोडण्या सुरू केल्याचे समजते.
- तालुक्यातील चौथा महत्त्वाचा गट असलेल्या माजी खासदार मंडलिक गटाची भूमिका अजून स्पष्ट नाही. परंतु लोकसभेच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांत जे सोशल वॉर झाले त्यावरून या गटाच्या भूमिकेबद्दल अंदाज बांधता येऊ शकतो. ठंडा करके खावो असे सध्यातरी त्यांचे धोरण आहे. परंतु या गटाचे धोरण काही ठरले तरी त्यांचे बरेचसे कार्यकर्ते मुश्रीफ यांनी विविध कामातून आपल्याशी जोडून ठेवले आहेत हे नाकारता येत नाही.
दुरंगी-तिरंगी लढतीतील फरक
यापूर्वीच्या लढतीत १९९८ ला पोटनिवडणुकीत संजय घाटगे ६६०० मतांनी विजयी झाले. मुश्रीफ १९९९ला २८८१, नंतर २००४ ला ११२५, त्यानंतर २०१४ ला ५९३४ मतांनी विजयी झाले. आणि २००९ ला तिरंगी लढत झाल्यावर ते तब्बल ४६,४१२ तर २०१९ ला २८,१३२ मतांनी विजयी झाले आहेत.
विधानसभा २०१९ चा निकाल
- हसन मुश्रीफ- राष्ट्रवादी काँग्रेस-१,१६,४३४
- समरजित घाटगे-अपक्ष - ८८,३०२
- संजय घाटगे-शिवसेना - ५५,६५७.