थेट नगराध्यक्ष निवड सुनावणी उद्या होणार
By admin | Published: October 2, 2016 12:49 AM2016-10-02T00:49:05+5:302016-10-02T00:49:05+5:30
इच्छुकांचे लक्ष : समूह प्रभाग रचनेचाही फैसला
कोल्हापूर : राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या थेट नगराध्यक्ष निवड व समूह प्रभाग रचना करण्यासाठी नगरपरिषद कायद्यामधील सुधारणेला आव्हान देण्यासाठी राज्यातून दाखल झालेल्या विविध याचिकांवर उद्या, सोमवारी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठात एकत्रित सुनावणी होणार आहे.
इचलकरंजीतील राजेंद्र पाटील व वकील जयंत बलुगडे यांनी हस्तक्षेप अर्ज अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत दाखल करून सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यावरही सुनावणी ह्या याचिकांसोबत ३ आॅक्टोबरला होणार आहे. हा अर्ज खासकरून इचलकरंजी येथील नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी तसेच राज्यातून विविध भागांतून दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. त्यामध्ये गेल्या काही वर्षांत इचलकरंजी शहरामध्ये कोणत्याही नगराध्यक्षाला त्याचा पूर्ण वेळ करू दिला नाही.
सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी सोमवारी होणार आहे. पुण्यातून रणखांबे यांच्या याचिकेमध्ये मुख्यत: समूह प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामध्ये भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करणार आहेत.