एटीएम फोडल्यास जळणार थेट नोटा!-- लोकमत विशेष...
By admin | Published: July 24, 2014 10:25 PM2014-07-24T22:25:15+5:302014-07-24T22:31:39+5:30
चोरट्यांचे ‘अज्ञान’ : कटावणी, गॅसकटर काहीही आणा; नोटांपर्यंत पोहोचणं केवळ अशक्य
दत्ता यादव - सातारा
गेल्या काही दिवसांत एटीएम मशीन फोडण्याच्या घटना घडत असल्या, तरी चोरट्यांना नोटांपर्यंत पोहोचता आलेलं नाही. तरीही चोरटे धोका पत्करून कष्ट वाया घालवत आहेत. वास्तविक, संपूर्ण मशीन उघडलं, तरी नोटांना हात लावणं आता शक्य राहिलेलं नाही. कारण नोटांना धक्का लागताच त्या क्षणार्धात जळून जातील, असं तंत्रज्ञान सध्या एटीएम मशीनमध्ये वापरलं जातंय.
जिल्ह्यात भुर्इंज, सातारा, कऱ्हाड, फलटण आदी ठिकाणी एटीएम मशीन फोडून पैसे पळविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी नजीकच्या काळात केला आहे. कटावणी, गॅसकटर आदी आयुधं वापरून मशीन फोडण्यात आली. परंतु कोणत्याही मशीनमधून पैसे चोरीला गेले नाहीत. तरीही ‘एटीएमची सुरक्षा’ या विषयावर नव्याने चर्चा सुरू झाली. आतापर्यंत पैसे पळविता आले नसले, तरी आगामी काळात तसं घडण्याची शक्यता असल्यामुळं एटीएम अधिक सुरक्षित केली जावीत, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त झाली.
या पार्श्वभूमीवर, एटीएमच्या सुरक्षेसाठी बँकांनी कोणते उपाय योजले आहेत, याचा धांडोळा घेतला असता, एटीएममधील रक्कम चोरीला जाणं यापुढे शक्य नाही, अशी बँकांच्या खातेदारांना आश्वस्त करणारी माहिती पुढे आली. या निमित्तानं एटीएम मशीनमध्ये आलेल्या नव्या तंत्रज्ञानाचीही ओळख झाली. एक तर एटीएम मशीन फोडणं सोपं नाही. मशीन फोडायला किमान चार ते पाच तास लागतात. त्यातूनही कुणी मशीनची ‘बॉडी’ तोडलीच, तरी त्याला पैसे चोरणं शक्य नाही.
एटीएमची अत्यंत कठीण अशी ‘बॉडी’ फोडली, तरी ज्या भागात पैसे ठेवलेले असतात, तिथं पोहोचण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक लॉक’ उघडावं लागतं आणि त्यासाठी ‘कोड’ माहीत असावा लागतो. समजा एखाद्या चोरट्याने तो ‘कोड’सुद्धा मिळवलाच, तरी त्याच्या हाती काहीच लागणार नाही. कारण मशीन ‘अनलॉक’ केलं तरी नोटा फक्त समोर दिसतील. नोटांना हात लावल्यास मात्र त्या क्षणार्धात पेट घेतील आणि चोरट्याच्या डोळ्यांदेखत जळून जातील.
चोरट्यांच्या दृष्टीने नोटा हा ‘पैसा’ असला तरी बँकांच्या दृष्टीने नोटा हे केवळ ‘चलन’ आहे. किती नोटा एटीएममध्ये भरल्या आणि त्यातल्या किती नोटा खातेदारांनी काढल्या, याचा हिशेब मशीनमध्ये असतोच. उरलेल्या नोटा जळून गेल्या, तरी ते केवळ ‘चलन’ असेल आणि ते बँकांना रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा मिळू शकेल.
फोडलेले एटीएम मशीन दुरुस्त करणे किंवा नवीन मशीन बसविणे, एवढाच खर्च बँकेला करावा लागेल. आज जवळजवळ सर्वच एटीएम मशीनमध्ये हे तंत्रज्ञान आले असून, चोरटे मात्र अज्ञानातून मशीन फोडण्यासाठी रात्री-अपरात्री धोका पत्करून घाम गाळत आहेत. एटीएमच्या नवीन तंत्रज्ञानामुळे चोरट्यांच्या घामाचं चीज होणं आता कधीच शक्य नाही.
इंग्लंडमधून येतात आधुनिक एटीएम मशीन
सर्वच बँकांच्या जवळजवळ सर्व शाखांमधील एटीएम मशीन आता अत्याधुनिक झाली आहेत. ही मशीन इंग्लंडमधील ‘एनसीआर’ या कंपनीकडून तयार केली जातात. या एटीएम मशीनचे वजन पाचशे ते सहाशे किलो असते. दणकट पोलादापासून तयार केलेल्या या मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक लॉकसह अनेक सुविधा नव्याने करण्यात आल्या आहेत. फाउंडेशनमध्ये कायमस्वरूपी बसविण्याची सुविधा नसली, तरी या मशीनचे वजन जास्त असल्यामुळे चोरट्यांना ते उचलून नेता येत नाही. वेगवेगळ्या मॉडेलनुसार या मशीनची किंमत सात ते दहा लाखांच्या घरात जाते.
नवीन तंत्रज्ञान बँकांसाठी लाभदायक
वर्षांपूर्वी बिहारमध्ये चोरट्यांनी जेसीबी वापरून चक्क एटीएम मशीन उचलून नेले होेते. काही दिवसांनंतर ते एटीएम मशीन एका शेतात सापडले होते. मात्र त्यातील सर्व पैसे काढून घेण्यात चोरट्यांना यश आले होेते. पूर्वीची एटीएम मशीन केवळ वजनाने जड होती. परंतु त्यामध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे चोरट्यांसाठी एटीएम मशीन ही घबाड होते. मात्र कालांतराने या धोका ओळखून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने एटीएम मशीन बनविण्यात आल्या आहेत. एटीएम मशीनचे हे नवे तंत्रज्ञान बँकांसाठी लाभदायक ठरले आहे.