थेट पाईपलाईन योजनेची चौकशी
By admin | Published: May 10, 2017 01:26 AM2017-05-10T01:26:07+5:302017-05-10T01:26:07+5:30
आठ दिवसांत अहवाल द्या : पालकमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश; कथित भ्रष्टाचाराची सरकारकडून गंभीर दखल
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नियोजित काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची चौकशी करून त्यासंबंधीचा अहवाल आठ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करा, असे स्पष्ट आदेश मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांना दिले. पालकमंत्र्यांच्या या आदेशामुळे योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर महानगरपालिका वर्तुळात गेले काही दिवस थेट पाईपलाईन पाणी योजनेसंदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून त्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात आयुक्त अभिजित चौधरी यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. दोघांव्यतिरिक्त कोणीही चर्चेत उपस्थित नव्हते. सुमारे वीस मिनिटे झालेल्या चर्चेनंतर खुद्द पालकमंत्री पाटील यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. ठिकपुर्लीजवळील कॅनॉलवर बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलाचे प्रत्यक्ष काम २५ लाखांचे झाले असताना कोणत्याही तपासणीशिवाय ठेकेदाराला या कामाच्या २ कोटी ४८ लाख रुपयांपैकी १ कोटी ४९ कोटी रुपये अदा करण्यात आले. यावरूनच या कामात भ्रष्टाचार झाल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या योजनेच्या कामाची संपूर्ण चौकशी करून येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल द्या, असा आदेश पालकमंत्री पाटील यांनी आयुक्तांना दिला. (पान १० वर) आयुक्त म्हणून तुम्ही स्वत: महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत झालेल्या कामाची चौकशी करावी, त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करा. त्यामध्ये निविदेत नमूद असलेली कामे, आतापर्यंत झालेली कामे आणि ठेकेदाराला दिलेली रक्कम याचीही माहिती या अहवालात असावी, तसेच तुमचे मतसुद्धा स्पष्टपणे नमूद करावे, अशी सूचनाही पाटील यांनी केली. योजनेचे सल्लागार युनिटी कन्सल्टंट यांचाही अहवाल मागवून घ्या, असेही आयुक्तांना बजावले. योजनेच्या कामाची चौकशी सुरू राहील तसेच त्याचे कामही सुरू राहील. काम बंद राहणार नाही. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कोणी आपल्या घरातून पैसे आणून ही योजना करत असल्यासारखी भाषा करू नये, असा टोलाही पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना हाणला. कदम बंधूंनी दिली चंद्रकांतदादांना भ्रष्टाचाराची माहिती आयुक्त चौधरी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक सुनील कदम यांच्याशी थेट पाईपलाईन विषयावर चर्चा केली. यावेळी आघाडीचे अध्यक्ष स्वरुप महाडिकही उपस्थित होते. कदम बंधूंनी थेट पाईपलाईन योजनेच्या कामात कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला आहे, याची सविस्तर माहिती पालकमंत्र्यांना दिली. ठिकपुर्लीजवळील लोखंडी पुलाचे काम फक्त २५ लाखांचे असताना ठेकेदारास १ कोटी ४९ लाख रुपये अदा करण्यात आले असून महापालिका आयुक्त चौधरी, कन्सल्टंट महेश पाठक यांनीही ते मान्य केले आहे. चुकीची कबुली देत त्यांनी बिल वळते करण्यात येईल, असेही सांगितले असले तरी हा संगनमताने झालेला भ्रष्टाचारच आहे. अशा अन्य पाच ब्रीजचे काम सुरू होणार आहे. अंदाजपत्रकात नेमका खर्च किती येणार हे न दाखवता ढोबळ मानाने जादा खर्च दाखविलेला आहे हे चुकीचे असल्याचे कदम बंधूंनी सांगितले. योजनेची चौकशी लावा, त्यातून बरेच सत्य बाहेर येईल, त्यात दोषी कोण आहेत हेसुद्धा स्पष्ट होईल, असा आग्रह कदम यांनी पालकमंत्र्यांकडे धरला.