थेट पाईपलाईनप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 12:37 AM2016-11-16T00:37:20+5:302016-11-16T00:37:20+5:30
सतेज पाटील : देखरेख, पाठपुराव्यासाठी जादा अधिकारी नेमणार; केंद्राने वाटा वाढविल्याने पालिकेवर अतिरिक्त भार
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना मनमोहनसिंग सरकारने मंजूर केली. त्यावेळी योजनेच्या एकूण खर्चापैकी १0 टक्के वाटा महापालिकेवर सोपविला होता; परंतु मोदी सरकारने आता तो २0 टक्के केला आहे. त्यामुळे खर्चाचा भार वाढणार असून, तो पालिकेला पेलणार नाही. म्हणून हा १0 टक्क्यांचा अतिरिक्त खर्च राज्य सरकारने सोसावा, अशी मागणी घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच भेटणार आहोत, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा आढावा घेतला आणि योजनेचे काम नेमके कोणत्या कारणांनी रेंगाळले आहे, याची माहिती करून घेतली. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, महिला बाल कल्याण सभापती वृषाली कदम , गट नेते शारंगधर देशमुख यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार व सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
योजना मंजूर झाली त्यावेळी योजनेच्या एकूण खर्चापैकी ८० टक्के रक्कम केंद्र सरकार, १० टक्के रक्कम राज्य सरकार, तर १० टक्के रक्कम महानगरपालिकेने स्वत:च्या फंडातून खर्च करायचे ठरले होते; पण अलीकडे केंद्र सरकारने ६०:२०:२० असा खर्चाचा भार निश्चित केला आहे. केंद्र सरकारने नवीन योजनांसाठी जर असा निर्णय घेतला असेल, तर ठिक आहे; पण जुन्या योजनांच्या खर्चात बदल करण्याची आवश्यकता नाही. जर योजनेच्या २० टक्के रक्कम पालिकेला गुंतवायची झाली, तर ती ९६ कोटींपर्यंत जाणार असून ती परवडणारी नाही. मी पालकमंत्री पाटील यांच्याशी बोललो असून, अतिरिक्त १0 टक्क्यांचा भार राज्य सरकारने सोसावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
आमचेच दुर्लक्ष झाले
आपण मोठ्या प्रयत्नातून राजकीय शक्ती पणाला लावून ही ४८५ कोटींची योजना मंजूर करून आणली. राज्यकर्ते म्हणून कर्तव्य पार पाडले. पुढील सर्व जबाबदारी अधिकारी वर्गावर आहे; पण त्यांनी काहीच केले नाही. योजनेकडे आमचेही दुर्लक्ष झाले, अशी कबुली आम. पाटील यांनी दिली.
आज सोळांकूरला भेट
जलवाहिनी टाकण्यासाठीचे लाईट आऊट देण्याचे काम पूर्ण झाले असून, सोळांकूर येथील प्रश्न सोडविण्यासाठी काही पदाधिकारी, अधिकारी आज, बुधवारी तेथे जाणार आहेत. पदाधिकारी, अधिकारी स्थानिक ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
जादा तज्ज्ञ अधिकारी नेमणार
योजनेचे काम दर्जेदार व्हावे, अशीच आमची सर्वांची अपेक्षा आहे; परंतु गेल्या वर्षभरातील आलेला अनुभव वाईट आहे. मनपा प्रशासनाने योजनेच्या पूर्ततेसाठी म्हणावा तितकासा पाठपुरावा केला नाही. काम रेंगाळले आहे. ते कोणत्या टप्प्यांवर रेंगाळले आहे, काय करायला पाहिजे, याची माहिती आयुक्तांनीही कधी आपणाला दिली नाही. त्यामुळे आम्हालाही त्याचा पाठपुरावा करता आला नाही; परंतु कोल्हापूर शहराच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली योजना जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी जादा तज्ज्ञ अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात येतील, असे आमदार पाटील यांनी सांगितले.