मुंबईतील सत्तेवर ठरणार जिल्ह्यातील राजकारणाची दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:31 PM2019-11-25T12:31:35+5:302019-11-25T12:34:11+5:30
नुक त्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. भाजपला आहे त्या दोन जागाही राखता आल्या नाहीत; तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या सहावरून केवळ एकवर आली. याउलट सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे चार आमदार निवडून आले आणि राष्ट्रवादीने आपल्या दोन जागा कायम राखल्या.
समीर देशपांडे
कोल्हापूर : राज्यातील सत्तासंघर्षाचे अपरिहार्य असे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यात उमटणार आहेत. या सत्तासंघर्षामध्ये नेमके कोण बाजी मारणार आहे, त्यावरच जिल्ह्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे, यात शंका नाही.
नुक त्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. भाजपला आहे त्या दोन जागाही राखता आल्या नाहीत; तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या सहावरून केवळ एकवर आली. याउलट सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे चार आमदार निवडून आले आणि राष्ट्रवादीने आपल्या दोन जागा कायम राखल्या. जनसुराज्य शक्ती एक, दोन अपक्षांनीही बाजी मारली.
परंतु या निकालावर नजर टाकताना शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या सहकार्यातून माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर पुन्हा एकवार आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट झाले; तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेला मात्र पुढे अडचणींचा डोंगर दिसू लागला.
चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार निवडून येऊ नये, ही नामुष्की पत्करावी लागली, हे वास्तव आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील नवा अध्यक्ष निवडताना या पक्षाला सहजसोपे जाणार नाही. दुसरीकडे ‘गोकुळ’ची निवडणूक सत्तारूढांना जड जाणार, असे वातावरण असताना मुश्रीफ, सतेज पाटील, संजय मंडलिक पुन्हा एकदा ‘गोकुळ’विरोधात रान उठवणार, हे निश्चित आहे. ज्या तडफेने चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक तालुक्यातून नेत्यांना ‘इनकमिंग’करून घेतले, त्यांतीलच अनेकजण नियोजनपूर्वक ‘जनसुराज्य शक्ती’मध्ये गेल्याने पुन्हा भाजपच्या झेंड्याखाली या सर्वांना आणायचे की नाही, याचा निर्णय या पक्षाला घ्यावा लागणार आहे.
दुसरीकडे, शिवसेनेला या निवडणुकीत प्रचंड तडाखा बसला. त्याचे पडसादही उमटले. खासदार संजय मंडलिक यांच्याविरोधात जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. मात्र दोन्ही कॉँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, या आशेवर शिवसेनेचे माजी आमदार आणि पदाधिकारी होते. याच परिस्थितीमुळे भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता होती.
परंतु शनिवार (दि. २३) नंतर परिस्थिती बदलत गेली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नेमकी उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेले १५ दिवस चिडीचूप असलेले भाजपचे पदाधिकारी साखर-पेढे वाटू लागले आणि उलट परिस्थिती कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या गोटात निर्माण झाली.
जर फडणवीस, पवार यांचे सरकार टिकले तर पुन्हा एकवार भाजपला बळ मिळणार आहे. राज्यातील सत्तेच्या जोरावर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता टिकविण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. ‘गोकुळ’च्या निवडणुकीमध्येही सत्तारूढांना त्यांचे सहकार्य राहणार आहे. एकूणच जिल्ह्याचे राजकारण यामुळे बदलणार आहे. त्यामुळे सध्या चारीही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या संभ्रमात आहेत. फडणवीस पवार बाजी मारणार का? त्यांना राष्ट्रवादीच्या आमदारांचे पाठबळ मिळणार का? हे सरकार टिकणार की दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, या सर्वच प्रश्नांची उत्तरे ३० नोव्हेंबरपर्यंत मिळणार असल्याने त्यावर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा अवलंबून आहे.
महाडिक आशावादी
लोकसभेला धनंजय महाडिक यांचा, तर विधानसभेला अमल महाडिक यांचा पराभव झाल्याने महाडिक परिवार राजकीयदृष्ट्या अडचणीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे, शौमिका महाडिक यांचीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची मुदत संपत आली आहे. ‘गोकुळ’ची निवडणूकही एकतर्फी राहिलेली नाही. अशातच दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करीत असल्याने महाडिकांच्या राजकीय वाटचालीतील अडचणींत वाढच होताना दिसत होती. मात्र देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या शपथ घेण्याने महाडिकांना दिलासा मिळाला आहे. हा दिलासा दीर्घकालीन आहे का, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.