संस्थाचालक , प्राध्यापकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:12 AM2020-03-01T00:12:15+5:302020-03-01T00:13:57+5:30
कोल्हापूर : शैक्षणिक संस्थाचालक, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचे अनेक प्रश्न शासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत संस्थाचालक, ...
कोल्हापूर : शैक्षणिक संस्थाचालक, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचे अनेक प्रश्न शासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत संस्थाचालक, प्राध्यापकांच्या विविध प्रस्तावांवर समोरासमोर चर्चा करून ते मार्गी लावण्याचे धोरण अवलंबिण्यात येईल. त्यासाठी जनता दरबार भरविला जाईल, त्यामुळे तुमचा मंत्रालयात खेटे घालण्याचा त्रास कमी होईल, असे प्रतिपादन राज्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शनिवारी संस्थाचालक, प्राचार्य संघटनांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थाचालकांकडून महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले.
सामंत म्हणाले, प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. माझ्या खात्याचे प्रश्न हे ‘टेबल टू टेबल’ सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. संस्था चालवताना काय अडचणी येतात याची मला माहिती आहे. महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक गाडा पुढे नेण्याबरोबरच संस्थाचालक आणि प्राचार्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहे. त्यासाठी तत्काळ बैठक घेऊन मार्गी लावू.
या बैठकीत भैय्या माने यांनी संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतची भूमिका मांडली तसेच शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती, सीएचबी प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तत्काळ बैठक घेण्याची मागणी केली.
प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील म्हणाले, संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर निर्णय होत नसल्याने शैक्षणिक कामकाज करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी पाच वर्षांनी बदलतात. त्यामुळे प्राचार्यही बदलले पाहिजेत. जे चांगले काम करतात त्यांना ठेवा. जे चांगले काम करत नाही त्यांना बदला.
नंदकुमार निकम म्हणाले, संस्थाचालक आणि प्राचार्यांचे प्रश्न फार वेगळे नाहीत. काही प्राचार्यांची पेन्शन प्रलंबित आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांवर चर्चा करून त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी. संयुक्त मिटिंग घेऊन आमची वस्तुस्थिती समजून घ्या.
सुभाष सूर्यवंशी म्हणाले, कायम विनाअनुदानित संस्थेची परिस्थिती खूप बिकट आहे. राज्यात किती महाविद्यालये विनाअनुदानित आहेत त्यांची माहिती शासनाकडून मिळत नाही. किसनराव कुºहाडे यांनी आपले प्रश्न मांडले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह संस्थाचालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकच हशा...
शासनाच्या शिक्षण विभागाच्या सद्य:स्थितीवर भाष्य करताना माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, एका मंदिराच्या आवारात चप्पल बाहेर काढून मंदिरात प्रवेश करण्याचा सूचना फलक लावला होता.
एक मनुष्य घरातून चप्पल न घालता दर्शनासाठी आला. त्याला सुरक्षा रक्षकांनी अडविले आणि विचारले, ‘चप्पल कुठे आहे’. तो म्हणाला, ‘माझे चप्पल घरी आहे’ तेव्हा तो सुरक्षा रक्षक म्हणाला, ‘चप्पल घालून या, मगच दर्शन जा,’ असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.