सरकारी कार्यालयांत घाणीचे साम्राज्य
By Admin | Published: December 26, 2014 09:22 PM2014-12-26T21:22:43+5:302014-12-27T00:04:08+5:30
इचलकरंजीत मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र..अधिकारी स्वच्छता अभियानात तर दिसत नाहीत
अतुल आंबी -इचलकरंजी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात करून स्वत:पासूनच स्वच्छतेला सुरुवात केली. त्यानंतर सर्व शासकीय कार्यालयांना स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले. स्वच्छतेबाबत शपथही दिली. तरीही इचलकरंजीत मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. अधिकारी स्वच्छता अभियानात तर दिसत नाहीत आणि त्यांच्या कार्यालयाचा परिसरच घाणीच्या विळख्यात सापडला आहे.
‘लोकमत’ने बुधवारी (दि.२४) शहरात विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात पसरलेले घाणीचे साम्राज्य कॅमेऱ्यात कैद केले. केंद्र शासनामार्फत सूचना असतानाही शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कार्यालयांच्या परिसरातच अस्वच्छता दिसत आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वच्छता अभियान सुरू झाल्यापासून दर रविवारी शहरातील विविध सार्वजनिक परिसरात कार्यकर्त्यांसमवेत स्वच्छता अभियान राबवितात. छायाचित्रात कैद केलेल्या काही शासकीय कार्यालयांच्या परिसरातही हाळवणकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वच्छता अभियान राबविले होते. मात्र, त्यानंतरही त्या कार्यालयांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वच्छता कायम ठेवली नसल्याचे दिसत आहे. शहरातील प्रांत कार्यालय, सहायक कामगार आयुक्त कार्यालय, भूमापन कार्यालय, पुरवठा कार्यालय, बीएसएनएल, आयजीएम, आदींसह अनेक शासकीय कार्यालये अस्वच्छ असल्याचे आढळले. केंद्र शासनामार्फत आलेल्या सूचना पाळाव्यात; अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा आदेश नसल्यामुळेच कदाचित अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष केले असावे, असे नागरिकांतून बोलले जात आहे.
१) इचलकरंजीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालय व भूमापन कार्यालय या दोन्ही कार्यालयांमध्ये असलेल्या स्टेडियममध्ये जाण्याच्या मार्गावर पाण्याच्या बाटल्या, चहाचे कप यांसह अन्य वस्तू टाकून, तसेच गुटखा व पान खाऊन थुंकून परिसर गलिच्छ करण्यात आला आहे. २) बीएसएनएल कार्यालयाभोवती नेहमीच कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. ३) नगरपालिकेच्या आयजीएम रुग्णालयाच्या परिसरातही घाणीचे साम्राज्य पसरले आहे.