अमेरिकेतील विवाहसोहळ्यात मोबाईल लाईव्हद्वारे पडल्या अक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 08:28 PM2021-04-22T20:28:27+5:302021-04-22T20:45:42+5:30
CoronaVirus Kolahpur: कोरोनाच्या कचाट्यात अडकल्यामुळे नउ महिन्यापूर्वी ठरलेला विवाहसोहळा अखेर मोबाईल लाईव्हचा आधार घेत या महिन्यात पार पडला. कोल्हापूरचा मुलगा आणि पंढरपूरच्या मुलीचा अमेरिकेत पार पडलेल्या या अनोख्या विवाहसोहळ्यात महाराष्ट्रातील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या त्यांच्या गावातूनच सहभागी झाले, आणि नातेवाईक, मित्रमंडळींनी मोबार्ईल लाईव्हद्वारेच ऑनलाईन अक्षता टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोरोनाच्या कचाट्यात अडकल्यामुळे नउ महिन्यापूर्वी ठरलेला विवाहसोहळा अखेर मोबाईल लाईव्हचा आधार घेत या महिन्यात पार पडला. कोल्हापूरचा मुलगा आणि पंढरपूरच्या मुलीचा अमेरिकेत पार पडलेल्या या अनोख्या विवाहसोहळ्यात महाराष्ट्रातील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या त्यांच्या गावातूनच सहभागी झाले, आणि नातेवाईक, मित्रमंडळींनी मोबार्ईल लाईव्हद्वारेच ऑनलाईन अक्षता टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूरातील नागेश कुंभार यांचा मुलगा अभिषेक आणि पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील उत्तम कुंभार यांची कन्या स्मिता यांचा विवाह सर्वसंमतीने मार्च २०२० मध्ये निश्चित झाला होता. दोघेही उच्चशिक्षित आहेत. अभिषेक हा अमेरिकेतील एका कंपनीत नोकरी करतो, तर स्मिता पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करते.कोरोनाची परिस्थिती दूर झाल्यानंतर कोल्हापूरात विवाहसमारंभ करण्याचे ठरले. विवाहाचा शुभमुहूर्तही काढण्यात आला. परंतु कोरोनामुळे अभिषेकला भारतात जाण्याची परवानगी मिळाली नाही. विवाह निश्चित होउन नउ महिने उलटले तरी त्याला भारतात येण्याची परवानगी मिळाली नाही. अखेर दोन्हींकडच्या नातेवाईकांनी अमरिकेतच जाण्याचे ठरवले.
सर्वांनी पासपोर्ट तयार केले आणि व्हिसा मंजूर होण्याच्या प्रतिक्षेत सर्वजण होते. मुहूर्त तर काढलेला, समारंभासाठी हॉलही ठरलेला होता. सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच नवरदेवाला सुटी न मिळाल्याने या मंगल सोहळ्यात विघ्न आले. पुन्हा सारेच हताश झाले. शेवटी वऱ्हाडी मंडळीशिवाय मुलीने एकटीनेच जाण्याचे ठरविले आणि विमानाने ती अमेरिकेत पोहोचली. सासुसासऱ्यांनीच कोल्हापूरातून येत पुण्याच्या विमानतळावर सुनेची पाठवणी केली.
१७ एप्रिल रोजी अमेरिकेतील मिशिगन येथे व्यंकटेश्वराच्या मंदिरात सनईच्या निनादात आणि भटजींच्या मंगलाष्टकाच्या सूरात अमेरिकन वेळेनुसार सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी तर भारतीय वेळेनुसार गोरज मुहूर्तावर सायंकाळी ७ वाजता ठरल्याप्रमाणे मोजक्याच मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत अखेर हे शुभमंगल निर्विघ्न पार पडले. या अनोख्या विवाहसोहळ्यात फेसबुक लाईव्ह आणि युट्यूबवरुन ऑनलाईन लाईव्हफेसबुक लाईव्ह आणि युट्यूबवरुन महाराष्ट्रातील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या त्यांच्या गावातूनच ऑनलाईन सहभागी झाले. नातेवाईकांनी तसेच मित्रमंडळींनी दूरुनच अक्षता टाकल्या आणि मोठ्यांनी शुभाशिर्वाद दिले.