अमेरिकेतील विवाहसोहळ्यात मोबाइल लाइव्हद्वारे पडल्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:48+5:302021-04-23T04:26:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या कचाट्यात अडकल्यामुळे नऊ महिन्यांपूर्वी ठरलेला विवाहसोहळा अखेर मोबाइल लाइव्हचा आधार घेत या महिन्यात ...

Disability caused by mobile live at a wedding in the US | अमेरिकेतील विवाहसोहळ्यात मोबाइल लाइव्हद्वारे पडल्या अक्षता

अमेरिकेतील विवाहसोहळ्यात मोबाइल लाइव्हद्वारे पडल्या अक्षता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या कचाट्यात अडकल्यामुळे नऊ महिन्यांपूर्वी ठरलेला विवाहसोहळा अखेर मोबाइल लाइव्हचा आधार घेत या महिन्यात पार पडला. कोल्हापूरचा मुलगा आणि पंढरपूरच्या मुलीचा अमेरिकेत पार पडलेल्या या अनोख्या विवाहसोहळ्यात महाराष्ट्रातील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या त्यांच्या गावातूनच सहभागी झाले आणि नातेवाईक, मित्रमंडळींनी मोबाइल लाइव्हद्वारेच ऑनलाइन अक्षता टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोल्हापुरातील योगेश कुंभार यांचा मुलगा अभिषेक आणि पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील उत्तम कुंभार यांची कन्या स्मिता यांचा विवाह सर्वसंमतीने मार्च २०२० मध्ये निश्चित झाला होता. दोघेही उच्चशिक्षित आहेत. अभिषेक हा अमेरिकेतील एका कंपनीत नोकरी करतो, तर स्मिता पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करते. कोरोनाची परिस्थिती दूर झाल्यानंतर कोल्हापुरात विवाहसमारंभ करण्याचे ठरले. विवाहाचा शुभमुहूर्तही काढण्यात आला; परंतु कोरोनामुळे अभिषेकला भारतात जाण्याची परवानगी मिळाली नाही. विवाह निश्चित होउन नऊ महिने उलटले तरी त्याला भारतात येण्याची परवानगी मिळाली नाही. अखेर दोन्हींकडच्या नातेवाइकांनी अमरिकेतच जाण्याचे ठरवले.

सर्वांनी पासपोर्ट तयार केले आणि व्हिसा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत सर्व जण होते. मुहूर्त तर काढलेला, समारंभासाठी हॉलही ठरलेला होता. सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच नवरदेवाला सुटी न मिळाल्याने या मंगल सोहळ्यात विघ्न आले. पुन्हा सारेच हताश झाले. शेवटी वऱ्हाडी मंडळीशिवाय मुलीने एकटीनेच जाण्याचे ठरविले आणि विमानाने ती अमेरिकेत पोहोचली. सासू-सासऱ्यांनीच कोल्हापुरातून येत पुण्याच्या विमानतळावर सुनेची पाठवणी केली.

१७ एप्रिल रोजी अमेरिकेतील मिशिगन येथे व्यंकटेश्वराच्या मंदिरात सनईच्या निनादात आणि भटजींच्या मंगलाष्टकाच्या सुरात अमेरिकन वेळेनुसार सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी, तर भारतीय वेळेनुसार गोरज मुहूर्तावर सायंकाळी ७ वाजता ठरल्याप्रमाणे मोजक्याच मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत अखेर हे शुभमंगल निर्विघ्न पार पडले. या अनोख्या विवाहसोहळ्यात फेसबुक लाइव्ह आणि यू-ट्यूबवरून महाराष्ट्रातील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या त्यांच्या गावातूनच ऑनलाइन सहभागी झाले. नातेवाइकांनी तसेच मित्रमंडळींनी दुरूनच अक्षता टाकल्या आणि मोठ्यांनी शुभाशीर्वाद दिले.

----------------------------------------------------------------

फोटो : कोल्हापुरातील योगेश कुंभार यांचा मुलगा अभिषेक आणि पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील उत्तम कुंभार यांची कन्या स्मिता अमेरिकेत विवाहबद्ध झाले.

फोटो ओळ : 22042021-kol-online marrige

फोटो ओळ : 22042021-kol-online marrige१

(बातमीदार : संदीप आडनाईक)

Web Title: Disability caused by mobile live at a wedding in the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.