अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांची ससेहाेलपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:15 AM2021-02-19T04:15:02+5:302021-02-19T04:15:02+5:30
संदीप आडनाईक/लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अस्थिव्यंग, अंध, कर्णबधिर, गतिमंद, मूकबधिर, मनोरुग्ण या प्रकारच्या दिव्यांगाना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची स्वतंत्र ...
संदीप आडनाईक/लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अस्थिव्यंग, अंध, कर्णबधिर, गतिमंद, मूकबधिर, मनोरुग्ण या प्रकारच्या दिव्यांगाना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची स्वतंत्र व्यवस्था कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात आहे, परंतु त्यांना प्राधान्य दिले जात नसल्याने दिव्यांगाची ससेहोलपट होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच सामान्य रुग्णांच्या गर्दीत घुसून या अपंगांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ नुसार अपंगत्वाच्या २१ प्रकारांमध्ये अपंगत्वाचे प्रमाण निश्चित करून तसे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूरात छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दर बुधवारी आणि शुक्रवारी अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. त्याची माहिती रुग्णालयाच्या यंत्रणेमार्फत ऑनलाईन भरली जाते आणि दिव्यांगांना नोंदणी क्रमांक दिला जातो.
यासाठी जिल्हाभरातील दिव्यांग येत असतात. त्यांना केसपेपर काढण्याची आणि त्यांच्या तपासणीची स्वतंत्र खिडकी आहे, परंतु, तरीही पुरेशा मनुष्यबळाअभावी सर्वसाधारण रुग्णांसोबतच त्यांचीही तपासणी करुन ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंतची वेळ असते.
नेमून दिलेल्या दिवशीही सामान्य रुग्णांच्या गर्दीतूनच वाट काढत, सृदृढांशी झटापट करत या अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. याशिवाय वेगवेगळ्या फिटनेस प्रमाणपत्र मिळविणारेही याच दिवशी येत असतात. या सर्वांबराबर झटापट करत, गर्दीत वाट काढत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असताना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या अपंगांना बरीच कसरत करावी लागत आहे. अनेकदा या अपंगांना मनस्ताप सहन करावा लागतो. येथे आल्यावर प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना पुन्हा माघारी जावे लागते.
दहावी आणि बारावीची परीक्षेचे वेळापत्रक निश्चित झाल्यामुळे एसएससी बोर्डाला अपंगांना सवलतीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते. अंधांना रायटर मिळविणे, विषयांमध्ये सवलत मिळविणे, परीक्षेसाठी वेळ वाढवून मागणे, जवळील परीक्षा केंद्र मिळविणे यासारख्या सवलती अपंगांना या प्रमाणपत्रानंतरच दिल्या जातात. त्यामुळे सध्या हे अपंग विद्यार्थी सीपीआरमध्ये गर्दी करत आहेत.
यांना लागते सवलतीचे वैद्यकीय प्रमाणपत्र
अस्थिव्यंग, अंध, कर्णबधिर, गतिमंद, मूकबधिर, मनोरुग्ण केवळ या प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि शैक्षणिक कारणांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयात दिले जाते.
कोट
केसपेपर आणि तपासणी करण्यासाठी स्वतंत्र दिवस नेमून दिला असला तरी अपंगांना सुलभपणे अपंग प्रमाणपत्र मिळण्यासाठी कसरत करावी लागते. कोरोनाचा धोका पत्करून जिल्ह्यातून आलेले अनेक अपंग व्यक्ती प्रमाणपत्रासाठी धडपड करत असतात. त्यांच्यासाठी ही व्यवस्था सुलभ करावी.
अजय वणकुद्रे, विशेष शिक्षक, विकास हायस्कूल, कोल्हापूर.
कोट
बुधवारी सकाळी ८ वाजता मी सीपीआर रुग्णालयातील नेत्रविभागात प्रमाणपत्र अपडेट करण्यासाठी गडहिंग्लजहून आले होते. परंतु प्रत्यक्षात माझी तपासणी पूर्ण व्हायला २ वाजले. माझ्यासाेबत आलेल्या नातेवाईकांनाही यासाठी तिष्ठत थांबावे लागले. ही व्यवस्था बदलली पाहीजे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र वेळ द्यावा तसेच स्वतंत्र केसपेपरसाठीची खिडकी तत्काळ सुरू करावी. मनुष्यबळ नसल्यास सकाळी ९ ते १२ दिव्यांगासाठीच व इतरांसाठी २ पर्यंतचा वेळ राखीव ठेवावा.
रतन गुरव, गडहिंग्लज.