तंटामुक्त मोहिमेला अपंगत्व?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:26 AM2017-08-08T00:26:19+5:302017-08-08T00:26:19+5:30
संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देवाळे : पन्हाळा पूर्व तालुक्यातील बहुतांशी गावे शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेमध्ये बक्षिसास पात्र ठरली. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी तंट्याबद्दल होणारी धुसफूस, वाद, तंटे संपले म्हणून सुटकेचा नि:श्वास टाकला; परंतु काही लोकप्रतिनिधी तरुण, सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताशी धरून आर्थिक आमिषे दाखवत असून शासनाच्या तंटामुक्त योजना अपंगत्वाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तंटामुक्त अध्यक्षांची मोकळीच फुशारकी.... घालत आहेत. तरी शासनाने अशा तंटामुक्ती गावात पुन्हा तंटा वाढ करणाºया लोकप्रतिनिधींवरती योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
महाराष्ट्र शासनाची महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना गेली काही वर्षे संपूर्ण राज्यभर राबवली जात असून ग्रामीण भागामध्ये विविध कारणांमुळे उद्भवणारे वाद-तंटे गावच्या स्थानिक पातळीवर मिटावेत, अशी शासनाची अपेक्षा असून गाव तंटामुक्त झाले, तर गावाच्या प्रगतीचे व विकासाचे मार्ग खुले होऊन गावात शांतता लाभून सर्व ग्रामस्थ एकमेकांच्या खांद्यास खांदा लावून संघटितपणे प्रयत्न केल्यास गावाचा विकास होईल व तंट्याबद्दल उद्भवणाºया कोर्टकचेरीच्या त्रासातून ग्रामस्थांची सुटका होईल, अशी अपेक्षा शासनाची आहे.
सध्या स्थानिक पातळीवर तडजोडीने तंटे, वाद मिटवण्याची आपल्याकडे तशी फार जुनी परंपरा आहे; परंतु हल्लीच्या कायद्याच्या राज्यात तंटे मिटविण्यासाठी तंटामुक्ती समिती झाली. अध्यक्षांना आपल्या निर्णयाला कायदेशीर बैठक प्राप्त होण्यासाठी थोडे कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांना कायदेशीर अधिकार मिळावेत आणि केवळ कागदोपत्री तंटामुक्ती होण्याऐवजी खरोखर गावात एकोपा निर्माण व्हावा, यासाठी त्यांची मानसिकता बनविण्यासाठी सक्षम नेतृत्व लोकप्रतिनिधींची गरज आहे. केवळ पुरस्कार मिळालेल्या गावात नव्हे, तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावांतील जास्तीत जास्त वाद, तंटे आपआपसात मिटविण्यासाठी ग्रामस्थ प्रतिनिधींच्या मदतीने पोलिसांनी प्रयत्न केल्यास पोलिसांवरील अतिरिक्त ताण कमी होईल व गावातील आपआपसातील वाद कमी होतील.
सत्ता-पैसा यामुळे संघर्ष विकोपास
१ सध्या शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींमध्ये सत्ता आणि पैसा यासाठी संघर्ष विकोपाला जात असून ग्रामीण भागामध्ये ग्र्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्याने तर पुन्हा तंटावाढ होत आहे. गावामध्ये तंटाच राहिला नाही तर आपले राजकारण चालणार कसे? असा राजकीय लोकप्रतिनिधींचा मानस असतो.
२ परिसरातील प्रत्येक खेड्यातील लोकप्रतिनिधी आपल्या स्वत:च्या वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी गावातील युवकांना हाताशी धरून तंटा मिटविण्यापेक्षा तंटा वाढविण्यावर भर देताना दिसत आहे. तरी तंटा वाढ करणाºया लोकप्रतिनिधींची दखल संबंधित विभागाने घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.