शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित
By admin | Published: September 15, 2014 11:04 PM2014-09-15T23:04:50+5:302014-09-15T23:20:07+5:30
मुक्त विद्यापीठ : शासनाच्या घटनाबाह्य कारभाराची पुष्टी
शिवाजी सावंत -गारगोटी -मुक्त विद्यापीठात शिकणाऱ्या सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्री शिप नाकारुन शासनाने घटनाबाह्य कारभाराची पुष्टी केल्याचे कृतीतून सिद्ध केले असून मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे.
घरचे अठराविश्व दारिद्र्य त्यामुळे नोकरी अथवा कोठे तरी काम करावे लागते. पण शिक्षण घेण्याची अनिवार इच्छाशक्ती काम करताना शिक्षणाची कवाडे शोधत असतात हे चित्र आहे दीनदलित मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांचे. या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी मुक्त विद्यापीठ व दूरशिक्षण पद्धती अस्तित्वात आली. विद्यापाठातून भटके-विमुक्त, जाती-जमाती, आर्थिक दुर्बल घटक, महिला अशा समाजातील वंचित घटकातील विद्यार्थी प्रवेश घेत असतो. मुळातच या प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षण व समाजापासून दूर आहे. अशा या प्रवाहाबाहेरील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण करणे, त्यांना सुविधा देणे आवश्यक असताना त्यांची स्कॉलरशिप, फ्री शिप नाकारुन शासन त्यांना प्रवाहाबाहेर ढकलण्यासाठी जाणीवपूर्व प्रयत्न करीत आहे का? असे या धोरणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
मुक्त विद्यापीठांच्या कोल्हापूर विभागाचा विचार करता शैक्षणिक साल २०१३-१४ या वर्षात २१ हजार ४८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर संपूर्ण राज्यात मुक्त विद्यापीठाच्या दहा विभागात दोन ते अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व त्यांच्यापुढील पिढीचा विचार करून शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेऊन या विद्यार्थ्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे, अन्यथा अडीच लाख कुटुंबांवर वाताहतीची वेळ येईल. मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर केंद्राचे संचालक डॉ. एस. एस. चौगले यांनी कोल्हापूर विभागाचे समाजकल्याण आयुक्त गायकवाड यांना अशा आशयाचे निवेदन दिले आहे. यावेळी मधुकर बोरसे, यशवंत पाटील, विजयसिंह रजपूत, विश्वजित भोसले आदी उपस्थित होते.