शेतकऱ्यांचे निढोरी कालव्याच्या अस्तरीकरणाअभावी नुकसान

By admin | Published: November 18, 2014 12:04 AM2014-11-18T00:04:13+5:302014-11-18T00:07:43+5:30

अधिकारी दुहेरी कात्रीत : कधी पाण्याविना, कधी पाण्यामुळेही तोटा

Disadvantages of the farmers due to lack of the canal system | शेतकऱ्यांचे निढोरी कालव्याच्या अस्तरीकरणाअभावी नुकसान

शेतकऱ्यांचे निढोरी कालव्याच्या अस्तरीकरणाअभावी नुकसान

Next

दत्तात्रय पाटील - म्हाकवे --काळम्मावाडी धरणामुळे राधानगरी, भुदरगडसह कागल तालुक्यात हरितक्रांती झाली. गेल्या २५ वर्षांपासून निढोरी कालव्यामुळे तालुक्यातील बहुतांशी भाग पाण्याखाली आला हे सत्य असले, तरी या मुख्य कालव्यामुळे धरण क्षेत्रापासून काही अंतरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी, तर पाण्यामुळे नुकसान होणारे शेतकरी पाणी सोडू नये यासाठी आटापिटा करीत आहेत. यामध्ये अधिकारी आणि प्रशासनाची दमछाक होत आहे.
काळम्मावाडी धरणापासून मुधाळतिट्ट्यापर्यंतच्या सुमारे २४ कि. मी. अंतर असणाऱ्या कालव्याचे दर्जेदार अस्तरीकरण होणे हाच यावरचा सोयीचा उपाय ठरणार आहे. १९९० मध्ये सुमारे २७ टी.एम.सी. पाणीसाठा असणाऱ्या काळम्मावाडी धरणातून निढोरी उजव्याकालव्याची खोदाई करण्यात आली. या मुख्य कालव्यातून सावर्डे, पिंपळगाव बुदु्रक, म्हाकवे मार्गे सीमाभागात जाणारा, बिद्री मार्ग, बाचणी, करनूरकडे तसेच निढोरीतून पश्चिमकडे जाणारा कूर कालवा आहे. या कालव्याच्या पाण्याने या लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आह; परंतु गेली १५ वर्षे अस्तरीकरण न झाल्यामुळे या कच्चा कालव्यातून झिरपणाऱ्या पाण्याने शेकडो एकर शेती बाधित होत आहे. याचा मुख्य फटका ऐनी, आरेगाव, पंडेवाडी, कासारवाडा, कासारपुतळे, सावर्डे, आदी गावांतील शेतकऱ्यांना बसत आहे.
या कालव्यातून कायम पाणी वाहत असल्यामुळे या २४ कि.मी. अंतरातील कालव्यानजीकच्या शेतीमध्ये कायम दलदल राहत असून, येथील शेतीला वाफसाच येत नाही. येथील शेती नापीक होण्याचा मोठा धोका संभवत आहे, तर कालव्यात पाणी सोडण्यामध्ये खंड पडल्यास मुदाळतिट्टा, म्हाकवे परिसर, बेलवळे, बाचणी परिसर आणि कूर भागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे येथील शेतकरी कालव्यामध्ये पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे वारंवार मागणी करीत आहेत.
म्हाकवे परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदने दिली आहेत, तर जनता दल (सेक्युलर)चे अँड. अरुण सोनाळकर व शरद पाडळकर यांनी ऐनी परिसरातील शेतकऱ्यांचे सततच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी महिन्यातून २० दिवसच पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी गोची होत असून, त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.


अस्तरीकरण कळीचा मुद्दा
धरणापासून तिट्ट्यापर्यंत असणाऱ्या २४ कि.मी. कालव्यातून ८५० क्युसेक पाणी सोडण्याची क्षमता आहे. मात्र, हा कालवा बहुतांशी ठिकाणी कमकुवत असल्यामुळे जोरदार पाण्याने फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या यातून सुमारे ४५० क्युसेक क्षमतेने पाणी साडले जाते. परिणामी म्हाकवेसह कर्नाटकातील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अपुरे पाणी मिळते, तर सौंदलगा, आडीच्या पुढील भागात नितांत गरज असतानाही आणि येथील पोटकालव्याचे अस्तरीकरण पूर्ण करूनही अद्याप पाणीच पोहोचलेले नाही. त्यामुळे किमान धरणापासून तिट्ट्यापर्यंतचे दर्जेदार अस्तरीकरण करणे हा सोयीचा पर्याय आहे.

Web Title: Disadvantages of the farmers due to lack of the canal system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.