कोल्हापूर उत्तर, चंदगड, करवीरमध्ये महायुतीत विसंवाद; बंडखोरीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:00 PM2024-10-23T13:00:23+5:302024-10-23T13:09:30+5:30

राजेश क्षीरसागर हे मंगळवारी दिवसभर मुंबईत होते

Disagreement in Mahayuti in Kolhapur North, chandgad, Karveer | कोल्हापूर उत्तर, चंदगड, करवीरमध्ये महायुतीत विसंवाद; बंडखोरीची शक्यता

कोल्हापूर उत्तर, चंदगड, करवीरमध्ये महायुतीत विसंवाद; बंडखोरीची शक्यता

कोल्हापूर : चंदगड, करवीर आणि कोल्हापूर उत्तरमध्येमहायुतीमध्ये विसंवाद असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी बंडखोरी ठरलेली आहे. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. 

कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर हे उमेदवारी निश्चित मानून उद्या अर्ज दाखल करणार आहेत तर सत्यजित कदम यांनी अजूनही आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. मुंबईतील भेटीगाठी आटोपून खासदार धनंजय महाडिक हे मंगळवारी पुण्यात आले आहेत. ते जिल्ह्याचे प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार आहेत.

दुसरीकडे चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र, भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हेे या ठिकाणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. गतवेळी भाजपचेच अशोक चराटी आणि रमेश रेडेकर यांनी त्यांचा विजय रोखल होता. यावेळी चराटी यांनीच पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

करवीर मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची उमेदवारी निश्चित आहे. परंतु या ठिकाणी महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या ‘जनसुराज्य’च्या विनय कोरे यांनी संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या तीन ठिकाणी युतीमध्येच मिठाचा खडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिकडे इचलकरंजीमध्येही भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी सुरेश हाळवणकर यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना काहीही झाले तरी भाजपचेच काम करण्याची ताकीद दिली आहे.

भाजपचे प्रमुख पदाधिकारी जाणार पुण्याला

भाजपचे जिल्ह्यातील प्रमुख ५० हून अधिक पदाधिकारी हे गुरुवारी कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. पाटील हे दुसऱ्यांदा कोथरूड मतदारसंघातून रिंगणात उतरत आहेत.

क्षीरसागर मुंबईत

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे मंगळवारी दिवसभर मुंबईत होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माझी उमेदवारी अडीच वर्षांपूर्वीच निश्चित झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Disagreement in Mahayuti in Kolhapur North, chandgad, Karveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.