बाजारभोगाव येथील पोस्टमनकडून अपहार
By admin | Published: June 27, 2015 12:12 AM2015-06-27T00:12:36+5:302015-06-27T00:14:07+5:30
निलंबनाची कारवाई : खातेदारांच्या दोन लाख रूपयांवर डल्ला
बाजारभोगाव : बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील पोस्टमन वैभव भगवान पाटील याने पोस्टाच्या कारभारात सुमारे दोन लाख रुपयांची अफरातफर केली आहे. गेल्या महिन्यापासून कागदपत्रांची तपासणी सुरू असून, अफरातफरीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पाटील याला निलंबित केल्याची माहिती कोल्हापूरचे सहायक उपविभागीय अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी दिली.ग्रामीण टपाल जीवन विमा व बचत खात्याचे हप्ते भरण्यासाठी खातेदारांनी विश्वासाने वैभव पाटील यांच्याकडे पैसे दिले होते. त्याने काहींना पैसे भरल्याच्या पावत्या दिल्या, तर काहींना बोगस पासबुके देऊन नोंदी केल्या, तर काहींना नंतर पावती देतो म्हणून वेळ मारून नेली. सन २०१२ पासून हा प्रकार सुरू होता. लोकांकडून पैसे घ्यायचे, बोगस पुस्तकामध्ये नोंद करायची, मात्र पोस्टाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे रक्कम पाठवायची नाही, अशी त्याची कार्यपद्धती होती. दरम्यान, काही खात्यांची मुदत संपल्यानंतर खातेदारांनी पैसे मागण्याचा त्याच्याकडे तगादा लावला.
काही लोकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर पाटील याची चौकशी होऊन दोषी आढळल्याने निलंबनाची कारवाई करण्यात
आली. पैसे परत द्यावे लागू नयेत म्हणून पुस्तकाची पाने गायब केली आहेत. त्यामुळे पोस्टाच्या विश्वासार्हतेबाबत लोकांतून शंका व्यक्त होत आहे.
वैभव पाटील याच्या कार्यपद्धतीबाबत कळे पोस्टात नागरिकांकडून विचारणा तसेच
तक्रारी केल्या जायच्या, मात्र तेथील महिला कर्मचारी लोकांना शहाणपणाचे डोस पाजून निरुत्तर करीत असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे कळे पोस्टातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी शिस्तीचे डोस पाजावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
टपाल कार्यालयाच्या व्यवहाराची प्रत्येक वर्षी वरिष्ठ कार्यालयाकडून आॅडिटरच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. तरीही बाजारभोगाव येथील टपाल कार्यालयात चाललेला सावळागोंधळ आॅडिटरच्या निदर्शनास कसा आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. संबंधित ‘आॅडिटर’चा याला पाठिंबा होता काय? असा संशय व्यक्त होत आहे.
बाजारभोगाव हायस्कूलच्या ४२ कर्मचाऱ्यांची पोस्टात खाती असून, सप्टेंबर २०१४ ते मार्च २०१५ पासून कर्मचाऱ्यांनी भरलेल्या एकूण ४४ हजार ७०० रुपयांची नोंद पाटील याने केली नसल्याची माहिती विभागप्रमुख रामदास भोई यांनी दिली.
आकडा वाढण्याची शक्यता
अफरातफरीची रक्कम सहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत असून, अधिकृत रेकॉर्डवरील रक्कमच खातेदारांना परत मिळणार आहे. मात्र,
पाटील याने बोगसगिरी करून हडप केलेली रक्कम परत मिळणार नाही, अशी माहिती अधीक्षक कोड्डा यांनी दिली.