इटकरेतील माय-लेक कोल्हापुरातून बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:21 AM2020-12-25T04:21:03+5:302020-12-25T04:21:03+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाहूपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडलेली, इटकरे (जि. सांगली) येथून आलेली ...
कोल्हापूर : कोल्हापूरच्या शाहूपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडलेली, इटकरे (जि. सांगली) येथून आलेली माय-लेक बेपत्ता झाले आहेत. रुक्साना आझाद जमादार (वय ५५) व रमझान आझाद जमादार (३८, रा. इटकरे, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. बेळगावनजीक त्यांचे वाहन व मोबाईल मिळाला. मात्र, दोघेही आढळले नाहीत. नातेवाईक पोलिसांच्या मदतीने दोघांचा शोध घेत असून त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे कारण पोलीस तपासत आहेत. याबाबत आझाद आप्पा जमादार (६२) यांनी शाहूपुरी पोलिसांत बेपत्ताची तक्रार दिली आहे.
रुक्साना जमादार व त्यांची मुलगी रमझान हे दोघे शुक्रवारपासून (दि. १८ डिसेंबर) घरातून कोल्हापुरात जातो असे सांगून बाहेर पडले. येथील शाहूपुरीतील एका रुग्णालयात ते रुक्साना यांच्यावर उपचार घेणार होते. पण तेथे न पोहोचल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली आहे. टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजनुसार त्यांची मोटार बेळगावच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. त्यानुसार शोध घेतला असता, बेळगावमधील गांधीनगर येथे महामार्गालगत त्यांची मोटार रस्त्याकडेला मिळाली. त्यात मोबाईल मिळाला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, रमझानचा आणखी एक मोबाईल क्रमांक असून, त्याचे हैदराबादमध्ये लोकेशन दाखवत असल्याने पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.