संघर्षातील शिलेदार यादीतून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:35+5:302021-04-21T04:24:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ बचावच्या माध्यमातून गेली सहा वर्षे सत्तारूढ गटाविरोधात संघर्ष करणारे शिलेदार मात्र उमेदवारीच्या यादीतून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ बचावच्या माध्यमातून गेली सहा वर्षे सत्तारूढ गटाविरोधात संघर्ष करणारे शिलेदार मात्र उमेदवारीच्या यादीतून गायब झाले आहेत. बाबासाहेब देवकर, विजयसिंह माेरे, किशोर पाटील, किरणसिंह पाटील, रमा बोंद्रे, बाळासाहेब कुपेकर यांनी मल्टिस्टेटच्या मुद्यावर रस्त्यावरचा संघर्ष केला. मात्र, त्यांना पॅनलमधून डावलल्याचे पडसाद सध्या ‘गोकुळ’च्या राजकारणात उमटले आहेत.
‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्तारूढ गटाला कडवी झुंज दिली. त्यावेळी त्यांचे राजकारणातील सगळे साथीदार सोडून गेले. मात्र, या संघर्षात दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी साथ देत नेटाने लढाई केली. थोड्या मतात पराभव झाला असला तरी ‘गोकुळ’ जिंकू शकतो, याचा आत्मविश्वास मंत्री पाटील यांना आला. त्यानंतरच्या मल्टिस्टेट, दूध दरवाढीसह लढाईत बाबासाहेब देवकर, किरणसिंह पाटील, किशोर पाटील, विजयसिंह मोरे, रमा बोंद्रे, बाळासाहेब कुपेकर, बाबासाहेब चौगले, अंजना रेडेकर आदींनी मंत्री पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून भाग घेतला. सर्वसाधारण सभेत, तर अनेकांना खुर्चीचा मार तर काहींना चप्पल खावी लागली, तरीही सत्तारूढ गटाविरोधातील लढ्यात ते मागे राहिले नाहीत. त्यामुळे विरोधी पॅनलमध्ये यापैकी बहुतांशी जणांना संधी मिळेल, अशीच अटकळ होती. मात्र, नेते आणि ठरावांच्या गोळाबेरजेत रस्त्यावरील शिलेदार घरातच राहिले. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.
या प्रमुखांनी घेतली माघार
अरुण इंगवले, सुरेश कुराडे, विष्णुपंत केसरकर, सदाशिव चरापले, हिंदूराव चौगले, दौलतराव जाधव, सत्यजित जाधव, बाळासाहेब कुपेकर, बाबा देसाई, बाबासाहेब देवकर, किरणसिंह पाटील, तानाजी पाटील, प्रवीणसिंह पाटील, सतीश पाटील (गिजवणे), रमा बोंद्रे, विजयसिंह माेरे, अभिषेक शिंपी.
शिरोळ वंचितच
मागील निवडणुकीत शिरोळ तालुक्यात दोन्ही आघाड्यांनी उमेदवारी दिल्या होत्या. यावेळेला हातकणंगले तालुक्याला संधी दिल्याने शिरोळ वंचितच राहिले.
सत्तारूढचा ‘पतंग’ तर विरोधी आघाडीची ‘कप-बशी’
माघारीची मुदत संपल्याने मंगळवारी सत्तारूढ व विरोधी आघाडीने निवडणूक कार्यालयाकडे चिन्हांची मागणी केली. सत्तारूढ गटाने ‘कप-बशी’, ‘पतंग’ व ‘रोडरोलर’, तर विरोधी आघाडीने ‘कप-बशी’ची मागणी केली होती. त्यानुसार सत्तारूढ गटाला ‘पतंग’, तर विरोधी आघाडीला ‘कप-बशी’ हे चिन्ह देण्यात आले.
चौदा विद्यमान, तिघांचे वारसदार रिंगणात
दोन्ही आघाड्यांमध्ये ‘गोकुळ’चे विद्यमान १७ पैकी १४ जण रिंगणात आहेत. अरुण नरके यांच्या जागी चेतन, जयश्री पाटील यांच्या ठिकाणी शशिकांत पाटील, तर राजेश पाटील यांच्या ठिकाणी सुश्मिता पाटील यांना संधी मिळाली. मागील संचालक मंडळात अठराव्या जागी चंद्रकांत बोेंद्रे निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर पाच वर्षे सत्तारूढ गटाने जागाच भरली नव्हती.