‘भोगावती’ पतसंस्थेत अपहार
By admin | Published: January 22, 2017 12:57 AM2017-01-22T00:57:17+5:302017-01-22T00:57:17+5:30
शनिवार पेठ शाखेत प्रकार : व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
एकनाथ पाटील --कोल्हापूर -शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले आहे. याप्रकरणी लेखापरीक्षक श्री. दानी यांनी शुक्रवारी (दि. २०) दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी शाखा व्यवस्थापक संशयित वामन गुळवणी याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला. या गैरव्यवहारात काही बड्या धेंड्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, भोगावती नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यालय शाहूनगर येथे आहे. कोल्हापुरात शनिवार पेठ
येथे तिची शाखा आहे. या शाखेचे १९९३ ते २०१५ या कालावधीचे लेखापरीक्षण श्री. दानी यांनी केले. यावेळी संस्थेमध्ये सुमारे ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. दानी यांनी संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यावर हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काही राजकीय नेत्यांनीही प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी मध्यस्थी केली; परंतु लेखापरीक्षक दानी यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. गुन्हा दाखल होणार याची चाहूल लागताच पतसंस्थेतील काही बड्या धेंड्यांनी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा परिषदेच्या एका माजी अध्यक्षाने या पतसंस्थेबरोबरच गृहनिर्माण संस्था स्थापन केली. त्यांच्या निधनानंतर या दोन्ही
संस्था बुडीत गेल्याने त्यावर काही वर्षांपूर्वी प्रशासक नेमले. शाहूनगर-परिते येथील मुख्य शाखा सध्या बंद आहे. शनिवार पेठेतील शाखेचे कामकाज सुरू आहे. येथील लेखापरीक्षणानंतर हा गैरव्यवहार उघडकीस आला.या गैरव्यवहारात शाखा व्यवस्थापकासह काही कर्मचारी व संचालकांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक केली जाईल. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दादा पवार अधिक तपास करीत आहेत.
भोगावती नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये गैरव्यहार झाला आहे. त्यासंबंधी गुन्हा दाखल आहे. संशयित आरोपी पसार होतील म्हणून त्यांची नावे गोपनीय ठेवली आहेत.
- तानाजी सावंत : पोलिस निरीक्षक लेखाव्यवस्थापकांनी दिली ४५ लाख अपहाराची पोलिसांत तक्रार
गैरव्यवहारात काही बड्या धेंड्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश
पतसंस्थेतील बड्या धेंड्यांचा पोलिस अधिकाऱ्यांवर दबावाचा प्रयत्न