वीस शाळांत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By admin | Published: February 15, 2015 11:30 PM2015-02-15T23:30:18+5:302015-02-15T23:47:27+5:30
प्रशासनाचा उपक्रम : विद्यार्थी, शिक्षकांबरोबरच पालकांचाही सहभाग
कुंभोज : भूकंप, पूर, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीदरम्यान प्राप्त परिस्थितीशी कसा सामना करावा, याबाबत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून नेहमीच मिळतात. तथापि, शाळा पातळीवर आकस्मिकपणे तसेच याहून वेगळ्या असणाऱ्या आपत्तींना सक्षमपणे तोंड देता यावे, या हेतूने शिक्षकांसह विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणअंतर्गत पुण्याच्या नागरी संरक्षण दलामार्फत हातकणंगले व पन्हाळा तालुक्यातील प्रत्येकी
दहा शाळांत सुरक्षा कवायतीद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.केरळमधील कुंभकोणम् येथील आग तसेच नुकत्याच पाकिस्तानातील पेशावर येथे शाळेतील विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे. शाळा तसेच शाळेच्या परिसरात भूकंप, आग, विषबाधा, चेंगराचेंगरी, पूर, वीज पडणे, बॉम्बस्फोट, अपघात, आदी आपत्ती केव्हाही निर्माण झाल्यास अशा आपत्तींना तोंड देण्याच्या सक्षम यंत्रणा आजही अस्तित्वात नाहीत. यासाठी हा उपक्रम राबविला.
प्राधिकरणाकडून प्रयत्न
आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सराव कवायतीद्वारे विद्यार्थी, शिक्षकांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. शारीरिक व मानसिक तयारी उपलब्ध करण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील रांगोळी, इंगळी, रुई, चंदूर, हिंगणगाव, खोची, घुणकी, जुने चावरे, जुने पारगाव, नीलेवाडी, तर पन्हाळ्यातील मल्हारपेठ सावर्डे, असंडोली, आकुर्डे, गोठे, अंबुर्डे, बोरगाव, माणगाव, सातवे सावर्डे, काखे, अशा वीस गावांतील प्राथमिक शाळांत पुण्यातील नागरी संरक्षण दलाच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थी-शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आले.