शिरोळमध्ये यंदाही आपत्ती व्यवस्थापन आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:34 AM2021-06-16T04:34:34+5:302021-06-16T04:34:34+5:30
संदीप बावचे जयसिंगपूर : संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदाही तालुका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आपत्ती आल्यास ...
संदीप बावचे
जयसिंगपूर : संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदाही तालुका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आपत्ती आल्यास निवारागृहे, त्याठिकाणी सोयीसुविधा, नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करता यावे, पशुधनाची पर्यायी व्यवस्था असा आराखडा तयार करण्यात आला आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती अजून संपलेली नसताना दुसरीकडे प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्याचे आव्हान आहे.
संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जात आहे. जवळपास ४३ गावे गृहित धरून नियोजन आखले जात आहे. महापुरामुळे गावे पाण्याखाली जाणा-या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. अनेकांकडून भाड्याने घरे घेण्याचा शोधदेखील सुरू आहे. पुरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने यंदाही चांगला पाऊस होणार असे सुतोवाच केले आहेत. त्यामुळे आपत्ती आल्यास नागरिकांचे स्थलांतर, पशुधनाची पर्यायी व्यवस्था असा आराखडा तयार करण्यात आला आहे. निवारागृहात किती लोक बसू शकतात, त्याठिकाणी पाणी, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा, मास्क, सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण असे नियोजन करण्यात आले आहे. तर पशुधनासाठी ठिकाणे देखील निश्चित करण्यात आली आहेत. अंशत: पूर्णत: बाधित होणारी गावे, त्यातील कुटुंब संख्या, लोकसंख्या, स्वत:ची पर्यायी व्यवस्था असलेली लोकसंख्या, स्थलांतरीत करावी लागणारी लोकसंख्या असे नियोजन आहे.
- पूर्णत: बाधित होणारी गावे
कवठेसार, अर्जुनवाड, घालवाड, शिरटी, कनवाड, कुटवाड, हसूर, बस्तवाड, कुरुंदवाड, बुबनाळ, गौरवाड, औरवाड, नृसिंहवाडी, राजापूरवाडी, राजापूर, खिद्रापूर, नवे दानवाड, जुने दानवाड अशी पूर्णत: बाधित होणारी गावे आहेत. अशा गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी शाळा नियोजित करण्यात आल्या आहेत.
प्रशासनावर ताण
शिरोळ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याचा वाढता ताण प्रशासनावर आहे. त्यातच संभाव्य महापुराचे नियोजन देखील असे नियोजन प्रशासनाला करावे लागत आहे.
कोट -
गतवर्षीप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे. लाइफ जॅकेट, यांत्रिकी बोटी याचे नियोजन केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित गावातील नागरिकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे.
- शंकर कवितके, गटविकास अधिकारी, शिरोळ