आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ऑन वॉर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:25+5:302021-07-23T04:16:25+5:30
कोल्हापूर : संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आता ‘ऑन वॉर’ असून नागरिकांच्या बचावकार्यासाठी बोटी, लाईफ जॅकेट, ...
कोल्हापूर : संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आता ‘ऑन वॉर’ असून नागरिकांच्या बचावकार्यासाठी बोटी, लाईफ जॅकेट, चेन सॉ, हायड्रोलिक स्लॅब कटर अशी अत्याधुनिक साधने सज्ज ठेवण्यात आली आहेत. यासह १२०० प्रशिक्षित स्वयंसेवकांची फौज तयार आहे. पूरबाधित होणाऱ्या शिरोळ, हातकणंगले, करवीर या तालुक्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून नागरिकांच्या रेस्क्यू ऑपरेशनसाठीची यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. यंत्रणेकडील ५७ बोटींपैकी शिरोळला १५, हातकणंगलेला ७ व करवीरसाठी १० बोटी पाठविण्यात आल्या आहेत. अन्य तालुक्यांना प्रत्येकी दोन दोन बोटी पाठविल्या आहेत. यंत्रणेकडे १२०० स्वयंसेवक असून त्यांपैकी ५०० मुली आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी १०० स्वयंसेवक असे नियोजन करण्यात आले आहे.
---
यंत्रणेकडील साहित्य
५७ बोटी, ९०० लाईफ जॅकेट, ४०० लाईफ रिंग, १८ इमर्जन्सी लाईट, ३० टॉर्च, ३६ चेन सॉ (झाडे कापणारे मशीन), १४ बीएसेट ( पाण्याखाली गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी वापरले जाणारे साहित्य), ६ हायड्रोलिक स्लॅब कटर (इमारतीचा भाग, दगड, स्लॅब कापणारे मशीन)
---
येथे संपर्क साधा
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत आहे. येथे तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करीत आहेत. पूरबाधित नागरिकांनी मदतीसाठी १०७७ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२३१-२६५९२३२, २६५२९५०,२६५२९५३ किंवा ५४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.
---
फोटो नं २२०७२०२१-कोल-आपत्ती
ओळ : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात ३ शिफ्टमध्ये २४ तास कर्मचारी कार्यरत आहेत.
----