शिरोळमध्ये स्रावसंकलन, लसीकरण एकाच छताखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:01+5:302021-04-16T04:23:01+5:30
शिरोळ : कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे तसेच कोरोनाची लक्षणे आढळून येत असलेल्या नागरिकांचे स्रावसंकलन शिरोळ ग्रामीण रुग्णालयात केले जात आहे. ...
शिरोळ : कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे तसेच कोरोनाची लक्षणे आढळून येत असलेल्या नागरिकांचे स्रावसंकलन शिरोळ ग्रामीण रुग्णालयात केले जात आहे. जवळच ४५ वर्षांवरील तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी नागरिकांच्या रांगा, उपस्थिती, संपर्क धोकादायक ठरणार नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गतवर्षी मौजे आगर येथील वसतिगृहाजवळ स्रावसंकलन सुविधा करण्यात आली होती. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर संकलन केंद्र बंद करण्यात आले होते. दरम्यान, सध्या शिरोळ ग्रामीण रुग्णालयात स्राव संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला हे केंद्र आहे. त्या अगदी जवळच लसीकरण केंद्रदेखील आहे. त्या ठिकाणी लस घेणारी व्यक्ती प्रथमत: नोंदणी करते. एकाच ठिकाणी स्राव संकलन व लसीकरणाची नोंद प्रक्रिया सुरू आहे. स्राव देण्यासाठी व लसीकरण नोंदणीसाठी गर्दी होत आहे. दैनंदिन दोनशेहून अधिक जणांचे लसीकरण होते; तर ७० ते ८० जणांचे स्राव घेतले जातात. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका पोहोचू शकतो. याबाबत नियोजन होणे गरजेचे आहे. प्राप्त परिस्थितीनुसार मर्यादित जागेमुळे ही दोन्ही केंद्रे रुग्णालयात सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रसन्न कुंभोजकर यांनी दिली.
फोटो - १५०४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात स्राव देण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात.