कोल्हा'पूर'! कोयना, राधानगरी, अलमट्टीमधून विसर्ग सुरू; शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 10:44 PM2019-08-04T22:44:03+5:302019-08-04T22:47:55+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती
कोल्हापूर : राधानगरी धरणाचे स्वयंचलित 7 दरवाजे उघडले असून, 11400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातून 67391, तर अलमट्टीमधून 303525 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. रात्री 9 वाजता पंचगंगेने 45.10 फूट इतकी पातळी गाठली असून 93 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उद्या (सोमवारी) सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि जिल्ह्यातील सद्यस्थिती पाहता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून उद्या सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्ग अतिवृष्टीमुळे बंद झाला आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावरुन मिरजेसाठी अतिरिक्त 5 बसेस सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. आजरा ते गडहिंग्लज मार्गावरील गिजवणे या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी उत्तुर मुमेवाडीमार्गे वळविण्यात आली आहे.
वाघबिळ ते पन्हाळगड मार्गावर मोठी भेग पडल्याने तसेच दरड कोसळल्याने पन्हाळगडाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सांगलीकडून कोल्हापूर मार्गावर शिरोली नाक्यावर सर्व्हिस रोडवर पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. पर्यायी नागाव फाट्यामार्गे वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी येथे पूर परिस्थितीची आज पाहणी केली. कोयनेमधून 67391, धोममधून 10000, कन्हेरमधून 16820 तर वारणामधून 20472 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे. कृष्णा नदीतील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन ती धोक्याची पातळी 45 फूटापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करु नये. पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून, सर्व विभाग सतर्क ठेवण्यात आले आहेत. प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.
१९८९ ला पंचगंगेच्या पुराची पातळी ५० फूट सहा इंच इतकी होती. २००५ ला ४९ फूट सहा इंच इतकी होती. आता ४६ फुटांपर्यंत पाणी पोहोचले आले. रेड झोनसंबंधी १९८९ चा पाटबंधारे विभागाचा अध्यादेश आहे, तो आजही कायम आहे.