राधानगरी आठवडा बाजाराला ग्रामपंचायतीने लावली शिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:32+5:302021-03-08T04:23:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : राधानगरीत रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांच्या बेशिस्तीला ग्रामपंचायतीने रविवारी काही प्रमाणात शिस्त लावली. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राधानगरी : राधानगरीत रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांच्या बेशिस्तीला ग्रामपंचायतीने रविवारी काही प्रमाणात शिस्त लावली. यामुळे निपाणी-देवगड राज्यमार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी झाली. याबाबत ‘लोकमत’ने ‘राधानगरीचा बाजार - बेशिस्त पूर्वापार’ असे वृत्त प्रसिद्ध करून ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले होते. ११० वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी बसवलेल्या या बाजारपेठेत प्रशस्त रस्ता आहे. कोल्हापूर व निपाणी यांना कोकण व गोव्याशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात व्यापाऱ्यांच्या बेशिस्तपणामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत होती. याबाबत यापूर्वीही ग्रामपंचायतीने शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र काही दिवसांतच व्यापारी शिस्त मोडत होते.
आज ग्रामपंचायतीने पाच ते सात मीटर रुंद असलेल्या रस्त्याच्या या दोन्ही बाजूंनी दोन ते तीन फूट अंतर ठेवून जागा आखून दिली आहे. त्याच्या आत व्यापार करण्याची सक्त सूचना व्यापाऱ्यांना दिली आहे. त्याप्रमाणे रविवारी व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद देत शिस्त लावून घेतली. त्यामुळे बाजारातून होणारी वाहतूक विनाअडथळा सुरू होती. त्यामुळे वाहनचालकासह नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.
मुख्य बाजारपेठेत शिस्त लागली आहे. मात्र मार्केट चौकातील दुचाकी पार्किंगमुळे सोन्याची शिरोली मार्गावर असणारा अडथळा कायम आहे. बाजारामुळे येथून तात्पुरती एस.टी. वाहतूक करताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे येथेही शिस्त लावण्याची गरज आहे.