शहरातील वाहतुकीला शिस्त लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:14+5:302020-12-13T04:37:14+5:30
कोल्हापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी येत्या चार दिवसांत महानगरपालिका, पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यातर्फे एकत्रित बैठक घेऊन ...
कोल्हापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी येत्या चार दिवसांत महानगरपालिका, पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यातर्फे एकत्रित बैठक घेऊन विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरातील अतिक्रमण हटाव, वाहन पार्किंग व रस्त्याकडेला वर्षानुवर्षे पडून असलेली बेवारस वाहने जप्त करणे अशी धडक मोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शनिवारी दिली.
अधीक्षक बलकवडे म्हणाले, शहरातील वाहतूक बेशिस्त बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी लवकरच महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि आरटीओ कार्यालय यांचे जबाबदार अधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. या बैठकीत शहरातील रस्त्यांवर व्यावसायिकांचे वाढते अतिक्रमण काढण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येणार आहेत. त्याशिवाय पार्किंगचा प्रश्नही निकाली काढण्यात येणार आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर सम-विषय तारखांना एका बाजूलाच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहने थांबविणे कमी होऊन पार्किंगचा प्रश्न निकाली निघेल. त्यातून वाहतुकीला शिस्त लावणे सोयीचे ठरणार आहे.
रस्त्यावर वाहन थांबविल्यास दंड
रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना पट्टे ओढूृन त्या पट्ट्यांच्या आतील बाजूस चारचाकी वाहन थांबविल्यास त्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ही धडक मोहीम प्रथम शहरात व नंतर संपूर्ण उपनगरांसह जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. अशा विविध मार्गांतून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात येणार आहे.
सीसी कॅमेऱ्यांतून वाहनधारकांवर गुन्हे
शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर सीसी कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवून गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. सध्या कोल्हापूर शहरात ‘सेफ सिटी’च्या वतीने १६७, तर इचलकरंजी शहरात १२२ सीसी कॅमेरे सुरू आहेत. त्यांचा आधार घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.
११ नवे सिग्नल उभारणार
शहरातील गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी पूर्वीच्या ३४ सिग्नलमध्ये ११ सिग्नलची नव्याने भर घालण्यात येणार आहे. त्याद्वारे गुन्हेगारी प्रवृत्तींवर नजर ठेवण्यात येणार आहे.
(तानाजी)