शिस्तबद्ध महामोर्चा लक्षवेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:49 AM2018-01-29T00:49:31+5:302018-01-29T00:50:21+5:30
कोल्हापूर : लिंगायत समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या महामोर्चावेळी दसरा चौकाच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग सभोवतीने वाहतुकीला बंद करण्यात आले होते. विशेषत: स्टेशन रोडवरील वाहतूक व्हीनस कॉर्नर चौकातून लक्ष्मीपुरीकडे वळविण्यात आली होती. योग्य नियोजन केल्यामुळे मोर्चासाठी अलोट गर्दी होऊनही वाहतुकीची कोठेही कोंडी निर्माण झाली नाही.
अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे रविवारी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असे महामोर्चाचे आयोजन केले होते. दसरा चौकात मोर्चाचे मुख्य व्यासपीठ असल्याने या मोर्चासाठी होणारी संभाव्य गर्दी विचारात घेता दसरा चौकाकडे येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले होते.
यासाठी सीपीआर चौक ते दसरा चौक, प्रिन्स शिवाजी पुतळा उद्यान, लक्ष्मीपुरीतील स्वयंभू गणेश मंदिर, कोंडा ओळ, व्हीनस चौक या ठिकाणी सुरक्षा कठडे उभारून दसरा चौकाकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे रोखून पर्यायी मार्गाने वळवली होती.
विशेषत: स्टेशन रोडवर व्हीनस कॉर्नर चौक ते गोकुळ हॉटेलसमोरील चौकापर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती, तर दुसºया मार्गे वाहतूक लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, न्यू शाहूपुरीकडे वळविली होती. वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यामुळे तसेच चौका-चौकांत वाहतूक वळविण्यासाठी मोर्चातील काही स्वयंसेवक व पोलीस उभे केले होते. त्यामुळे शहरात कोठेही वाहतुकीची कोंडी झालीच नाही. या शिस्तीचे कौतुक होत आहे.
पंचगंगा घाट, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदान येथे पार्किंग फुल्ल
शहरात मोर्चासाठी येणारे जथ्थे विशेषत: शहराच्या पूर्वेकडून येत होते. पार्किंगची सोय जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी ए.पी. हायस्कूल तसेच दाभोळकर चौकानजीक सासने मैदान येथे करण्यात आली होती. या बाजूने खासगी वाहनाने कोल्हापूर जिल्ह्यातून विशेषत: शिरोळ, हातकणंगले या तालुक्यांसह जयसिंगपूर, सांगली, मिरज, सोलापूर, उत्तर कर्नाटक, विजापूर, आदी भागातून मोठ्या संख्येने लिंगायत बांधव हातात, वाहनांना भगवे झेंडे लावून डोक्यावर ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत’ असे लिहिलेल्या टोप्या घालून सहभागी झाले होते. तसेच पंचगंगा घाट, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदान, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोरील मैदान (नागाळा पार्क) परिसरात वाहने पार्किंगची सोय करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणचे वाहन पार्किंग फुल्ल झाले होते. येथे वाहने पार्किंग करून समाज बांधवांचे जथ्थे हातात भगवे झेंडे घेऊन, घोषणा देत पायी दसरा चौकच्या दिशेने येऊन मोर्चात सहभागी होत होते.
पहाटेपासून रस्ते वाहतुकीस बंद
दसरा चौकातील महामोर्चाच्या मुख्य व्यासपीठाकडे येणारे सहा मार्ग रविवारी पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. या मार्गावर बॅरिकेट्स लावले होते. तसेच वाहतूक पोलीसही बंदोबस्तासाठी तैनात होते.
पार्किंगचे नियोजन
मोर्चामध्ये सहभागी होणाºयांसाठी सासने मैदान, ए. पी. हायस्कूल, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, पंचगंगा नदीघाट परिसर, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारी खुल्या जागेत, पंचगंगा घाट परिसरातील विवेकानंद हायस्कूल मैदान येथे वाहनांच्या पार्किंगचे नियोजन शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे करण्यात आले होते. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर शहरवासीयांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले नाही.