आरोपीच्या नार्को तपासणीबाबत आज खुलासा
By Admin | Published: February 10, 2015 12:12 AM2015-02-10T00:12:31+5:302015-02-10T00:31:08+5:30
उज्ज्वल निकम : खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
कोल्हापूर : शाळकरी मुलगा दर्शन शहा खून प्रकरणाच्या सुनावणीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. मुळे यांच्या न्यायालयात सोमवारपासून सुरुवात झाली. संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे याचे वकील पीटर बारदस्कर यांनी चांदणेची नार्को तपासणी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. तो अर्ज निकाली काढून खटला चालविण्यात यावा, अशी विनंती केली आहे. त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपीने नार्को तपासणीसाठी केलेल्या अर्जाची नक्कल मागवून घेतली आहे. त्यावर आज, मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार खुलासा सादर करणार असल्याचे सांगितले.
पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी दि. २६ डिसेंबर २०१२ रोजी देवकर पाणंद येथील दर्शन रोहित शहा या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. मुळे यांच्या न्यायालयात सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रारंभ झाला. विशेष सरकारी वकील निकम यांनी आरोपीने मी खटला चालवू नये यासाठी माझ्याविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. खटल्यातील सहा साक्षीदार उपस्थित असून सुनावणीला सुरुवात करावी, अशी विनंती केली. त्यावर आरोपीचे वकील बारदस्कर यांनी आरोपी चांदणे याने स्वत:ची नार्को तपासणी करावी, असा विनंती अर्ज न्यायालयात सादर केला आहे. तो अर्ज पहिल्यांदा निकाली काढावा, त्यानंतर सुनावणीला सुरुवात करावी, अशी विनंती केली.
त्यावर अॅड. निकम यांनी आक्षेप घेत नार्को तपासणी हा काही पुरावा होऊ शकत नाही, त्यामुळे खटल्याची सुनावणी सुरू करावी, असा युक्तिवाद मांडला. दोन्ही बाजंूचे म्हणणे ऐकून न्यायाधीश मुळे यांनी अॅड. निकम यांना आरोपीने नार्को तपासणीसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत आपला खुलासा सादर करावा, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानुसार अॅड. निकम हे मंगळवारी खुलासा सादर करणार आहेत. चांदणे याची नार्को तपासणी करायची की नाही, या अंतिम निर्णयानंतर मुख्य खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चांदणेला ताकीद
संशयित आरोपी चारू चांदणे याने यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान साक्षीदारास धमकाविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला पुन्हा असा प्रकार घडता कामा नये, अशी ताकीद दिली असल्याचे तपासी अधिकारी यशवंत केडगे यांनी दिली.