शिवाजी विद्यापीठात स्तनांच्या कर्करोगावर फेरोसीफेन औैषधाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:00+5:302021-02-05T07:15:00+5:30

कोल्हापूर : स्तनांच्या कर्करोगावर सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या फेरोसीफेन औषधाविषयी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाने ...

Discovery of ferrocephene drug on breast cancer at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात स्तनांच्या कर्करोगावर फेरोसीफेन औैषधाचा शोध

शिवाजी विद्यापीठात स्तनांच्या कर्करोगावर फेरोसीफेन औैषधाचा शोध

googlenewsNext

कोल्हापूर : स्तनांच्या कर्करोगावर सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या फेरोसीफेन औषधाविषयी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाने यशस्वी संशोधन केले आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनाला पेटंटही मिळाले आहे. रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. गजानन राशिनकर आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ही बहुमोल कामगिरी केली आहे.

टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्या ॲडव्हान्स्ड सेंटर कॅन्सर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन, नवी मुंबई येथे स्तनांच्या कर्करोगाच्या पेशींवर संशोधनात विकसित केलेल्या संयुगांची चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालात असे आढळून आले की, ही संयुगे कर्करोगाच्या पेशींना पूर्णपणे नष्ट करतात; परंतु शरीरातील सामान्य पेशींना मात्र अपाय करीत नाहीत. इतकी ती सुरक्षित आहेत़

गेल्या काही दशकांमध्ये जगभरात तसेच भारतातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः महिलांमधील स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. या कर्करोगामुळे महिलांचा जागतिक मृत्यूदर अधिक आहे. स्तनांचा कर्करोग हा जटिल आजार आहे़ या कर्करोगाच्या उपचारासाठी सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी, अँटीबॉडीज अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धती विकसित केल्या आहेत; परंतु या उपचार पद्धतींमध्ये रुग्णाला उपचारादरम्यान होणाऱ्या दुष्परिणामांना (साईड इफेक्ट्स) सामोरे जावे लागते़ कर्करोगावरील औषधांमध्ये आढळणाऱ्या प्रतिरोधामुळे (ड्रग रेजिस्टन्स) सातत्याने नवनवीन संशोधनातून विकसित केलेल्या औषधांची गरज भासते. डॉ. राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बनसोडे यांनी "सिंथेटिक स्टडीज इन न्यू अँटीकॅन्सर थेराप्युटिक्स" या विषयावर पी.एच.डी.चे संशोधन केले आणि महत्त्वपूर्ण निष्कर्ष पुढे आले.

त्यानंतर फेरोसीनचा वापर करून स्तनांच्या कर्करोगावर अत्यंत प्रभावी व सुरक्षित औषध विकसित करता येईल या हेतूने डॉ. बनसोडे यांनी डॉ. राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली "फेरोसीन लेबल्ड एन-हेटरोसायक्लिक कारबिन कॉम्प्लेक्स ऑफ सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम" या विषयावर संशोधन पूर्ण केले. या संशोधनात त्यांनी फेरोसीन तसेच एन- हेटरोसायक्लिक कारबिन या घटकांचा वापर करून चांदी, सोने व प्लॅटिनम यांची एकूण दहा संयुगे (कॉम्प्लेक्स) प्रयोगशाळेत तयार केली. रसायनशास्त्रातील विविध तंत्रज्ञानाचा वापर करून या संयुगांची रचना अभ्यासली.

चौकट ०१

फेरोसीफेन औषधाचा शोध

कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांमध्ये चांदी, सोने व प्लॅटिनम या राजधातूंना त्यांच्या विशिष्ट जैविक गुणधर्मांमुळे विशेष महत्त्व आहे; परंतु या धातूंचे सामान्य पेशींवरही दुष्परिणाम होतात. कर्करोगावरील औषधे ही सामान्य पेशी व कर्करोगाच्या पेशी यात फरक करण्यास असमर्थ ठरतात. यामुळे रुग्णांना केमोथेरपी उपचारांदरम्यान या औषधांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. स्तनांच्या कर्करोगावर उपयुक्त टॅमॉक्सीफेन या औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी व उपचाराची उपयुक्तता वाढविण्यासाठी फेरोसीन हा घटक वापरून फेरोसीफेन हे उपयुक्त औषध तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. फेरोसीन हा घटक मानवी शरीरास अपायकारक नाही, हे या संशोधनातून सिद्ध झाले आहे़

चौकट ०२

संशोधनाला भारतीय पेटंट प्रदान

या महत्त्वपूर्ण संशोधनाची १४ मार्च २०१८ ला भारतीय पेटंटसाठी नोंदणी झाली होती. विविध स्तरांवरील शास्त्रीय व पेटंट कायदेविषयक परीक्षणानंतर भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने २२ जानेवारी २०२१ ला या संशोधनाचे पेटंट डॉ. गजानन राशिनकर व डॉ. प्रकाश बनसोडे यांना प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

प्रतिक्रिया

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी स्तनांच्या कर्करोगासाठी केलेले संशोधन महिलांसाठी वरदानच आहे. या आजाराने ग्रस्त महिलांचे प्रमाण पाहता शरीरातील सर्वसामान्य पेशींना अपाय न पोहोचविता केवळ कर्करोगग्रस्त पेशींवर प्रभाव दाखविणारे हे औषध असल्याने कर्करोगावर अधिक जलदगतीने उपचार होण्याची शक्यता वाढली आहे. या संशोधनामुळे विद्यापीठाचा नांवलौकिक वाढला आहे.

डॉ. डी. टी. शिर्के,

कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

फोटो : सिंगल

२९०१२०२१-कोल- राशिनकर एसयुके

२९०१२०२१-कोल-बनसोडे एसयुके

Web Title: Discovery of ferrocephene drug on breast cancer at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.