शहीद माने यांच्या कुटुंबीयांची परवड
By admin | Published: August 5, 2015 12:09 AM2015-08-05T00:09:03+5:302015-08-05T00:09:03+5:30
आश्वासने विरली हवेत : स्मारकाचा प्रश्न अंधातरीच, कुटुंबाचे रेशनही बंद
अनिल पाटील - मुरगूड -देशाचे संरक्षण करताना सीमेवर दहा आॅगस्ट २0१३ ला पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथील कुंडलिक केरबा माने यांच्या कुटुंबीयांची परवड सुरूच आहे. अगदी रेशन, एस.टी.पास, आदी शासकीय सेवा या कुटुंबीयांच्या बंद झाल्या असून, त्यांच्या घरी गवतातून, चिखलातून जावे लागते.
मानेंच्या अंत्यसंस्कारावेळी नेत्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली असून शासनाच्या उदासीन धोरणामुळे कुंडलिक माने यांच्या स्मारकाचा प्रश्नही अंधातरीच राहिला आहे. कुंडलिक माने शहीद झाल्याची बातमी सर्वच वर्तमानपत्रांमधून व वृत्तवाहिन्यांवरून सलग तीन चार दिवस दिल्याने अंत्यसंस्काराला तर लाखोंची गर्दी झाली होती. त्याच दिवशी तत्कालीन मंत्रिमंडळातील बड्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवत मानेंच्या स्मृती जपण्यासाठी मोठमोठी आश्वासने दिली होती. त्यातील बहुतेक आश्वासने हवेत विरली आहेत.तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांचे एका महिन्याचे वेतन माने कुटुंबीयांना देण्याचे अभिवचन दिले होते; पण आमदार हसन मुश्रीफ, राजू शेट्टी, सदाशिवराव मंडलिक, राजेश क्षीरसागर, सा. रे. पाटील व रामदास आठवले यांच्याशिवाय कोणत्याही राजकीय व्यक्तीचे मानधन कुटुंबीयांना मिळाले नाही. मिळालेल्या रकमेतून माने कुटुंबीय स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम साजरे करीत आहेत. कुंडलिक यांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असून, कुटुंबाच्या पालन पोषणासाठी वीरपत्नी राजश्री किंवा वीरबंधू विजय यापैकी एकास शासनाने नोकरीत घेण्याचे अभिवचन दिले होते. त्याची अंमलबजावणी झालीच नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, कुंडलिक माने शहीद झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरामध्ये त्यांच्या
कु टुंबीयांना देण्यात येणारे रेशनसुद्धा शासनाच्या प्रतिनिधींनी बंद केले आहे. त्यामुळे शासकीय सेवा का बंद झाल्या, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे. शहीद मानेंच्या गावाच्या बाहेर असणाऱ्या घरी जाण्यासाठी पक्का रस्ता सुद्धा शासनाला करता आला नाही. शहिद मानेंच्या अंत्ययात्रेवेळी युद्धपातळीवर संपूर्ण गावचे रस्ते चकाचक करणारे प्रशासक आता गप्प का ? टीव्ही, वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी मिळविण्यासाठी घटनेवेळी पुढे-पुढे असणारे नेते, कार्यकर्ते या माने कुटुंबाच्या सर्व प्रश्नांकडे लक्ष देतील का? असा प्रश्न यानिमित्ताने माने यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या पूर्व संध्येला निर्माण होत आहे.
सैनिकी शाळा नाहीच
शासनाने परिसरामधील मानेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ सैनिकी प्रशिक्षण शाळा स्थापण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी राज्यात सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार होते. पिंपळगावमध्ये भव्य स्मारक बांधण्याचा मनोदय अनेक स्थानिक नेत्यांनी बोलून दाखविला; पण दोन वर्षे उलटली, तरी अद्याप या स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली नाही.